अमरावती : विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाला. दुसरीकडं राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरणार असणाल्याची वल्गना करणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या आहेत. तर अमरावती जिल्हयातून काँग्रेसचा पार सुपडासाफ झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 2024 च्या निवडणुकीत अमरावती जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. काँग्रेसचा एकही आमदार विधानसभा निवडणूक 2024 मध्ये निवडून येऊ शकला नाही.
आठ पैकी पाच मतदारसंघात होता पंजा : काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या महाआघाडीमध्ये अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघापैकी अमरावती, तिवसा, अचलपूर मेळघाट आणि धामणगाव रेल्वे या पाच मतदारसंघात काँग्रेसचा रिंगणात पंजा होता. या पाच पैकी एकाही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. अमरावतीमध्ये माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, तिवसा येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, अचलपूरमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, मेळघाटात डॉ. हेमंत चिमोटे आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघात माजी आमदार वीरेंद्र जगताप हे काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र पाचही मतदारसंघात काँग्रेसच्या या उमेदवारांना मतदारांनी नाकारलं.
2019 मध्ये काँग्रेसच्या तिघांचा विजय : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या एकूण आठ विधानसभा मतदारसंघांतील लढतीत तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आले. यामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघात सुलभा खोडके, तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर आणि दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बळवंत वानखडे हे विजयी झाले. या तिघांपैकी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे हे लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन अमरावतीचे खासदार झाले तर अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या 2024 च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार होत्या. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव करून विजय मिळवला.
1962 ते 2019 पर्यंत किती होते काँग्रेसचे आमदार : 1962 मध्ये अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे तीन उमेदवार होते. 1977 च्या निवडणुकीत सात आमदार निवडून आलेत. 1972 मध्ये आठ, 1978 मध्ये सहा, 1980 मध्ये आठ, 1985 मध्ये सात, 1990 मध्ये दोन, 1995 च्या निवडणुकीत दोन, 1999 मध्ये तीन, 2004 मध्ये दोन, 2009 मध्ये चार, 2014 मध्ये दोन, 2019 च्या निवडणुकीत तीन आमदार निवडून आले. 2024 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचा एकही आमदार आता अमरावती जिल्ह्यात निवडून आला नाही.
हेही वाचा :