मुंबई : मुंबईच्या रेल्वे मार्गांवर एक शतकापूर्वी सुरू झालेल्या एका परिवर्तनकारी प्रवासानं आज भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठलाय. 3 फेब्रुवारी 1925 हा दिवस मुंबई आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. कारण याच दिवशी भारतात पहिली विद्युत रेल्वे धावली.
मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला मार्गावर धावलेली पहिली विद्युत लोकल ही भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाची सुरुवात (electrification of Indian Railways) ठरली. आज 3 फेब्रुवारी 2025 रोजी या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. या शतकभराच्या प्रवासात रेल्वे वाहतुकीचं स्वरूप आणि पर्यावरणपूरकतेसाठी दिशा बदलली आहे. मुंबईतील या ऐतिहासिक परिवर्तनानं देशभरात आधुनिकतेची लाट आणली.
The Mumbai Division shines in vibrant colours to celebrate the centenary of railway electrification, Central Railway 1925 - 2025.@Central_Railway pic.twitter.com/cvt3TrjsUM
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) February 2, 2025
1925 च्या दशकात मुंबई शहर औद्योगिकदृष्ट्या भरभराटीच्या दिशेनं चाललं होते. लोकसंख्या वाढत असताना पारंपरिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनांवरील रेल्वे प्रणाली नेहमीच प्रदूषण वाढविणारी आणि मंदगतीनं धावणारी ठरली होती. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि प्रवासाच्या ताणाला तोंड देण्यासाठी, ब्रिटिश कालीन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीनं मुंबई उपनगरीय रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 1925 मध्ये सुरू झालेला भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या प्रवासानं आज 100 वर्षे पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. भारतीय रेल्वेनं हा एक शतकभराचा ऐतिहासिक प्रवास करत, केवळ प्रवासाचे साधन नाही तर देशाच्या विकासाचा एक मजबूत कणा ठरला आहे. त्यामुळे हा प्रवास केवळ कार्यक्षम आणि वेगवान वाहतुकीचं प्रतीक नाही, तर तो पर्यावरणाच्या दृष्टीनंही एक आदर्श ठरला आहे.
भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा इतिहास : 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या मार्गावर भारताची पहिली विद्युत लोकल धावली. 16 किमी लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या या पहिल्या विद्युत रेल्वेनं रेल्वे वाहतुकीमध्ये एक नवीन पर्व सुरू केलं. त्याकाळी 1.5 केव्ही डीसी ओव्हरहेड वायर प्रणालीचा वापर करण्यात आला. या रेल्वेनं 80 किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्याची क्षमता दाखवली. त्यात ब्रिटीशकालीन लोकलमध्ये चार डबे होते. त्यासोबतच या लोकल रेल्वेचे डबे लाकडी आणि लोखंडी मिश्रित बनवण्यात आलं होतं. वाफेच्या इंजिनांना पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर चढण्यासाठी अडचणी येत होत्या. पुढं 1920 मध्ये पुणे, इगतपुरी आणि वसई मार्गांच्या विद्युतीकरणास मंजुरी मिळाली.
ब्रॉडगेज नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण- रेल्वेच्या अधिकृत नोंदीनुसार, 1950 नंतर भारतानं रेल्वेच्या विद्युतीकरणाला गती दिली. स्टीम इंजिन हटवून डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन वापरण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा झाली. पारंपरिक स्टीम इंजिन आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेनं केलेल्या विद्युतीकरणामुळं रेल्वेची कार्यक्षमता आणि वेग खूप वाढला. 1927 मध्ये आठ डब्यांची लोकल सुरू झाली. 1961 मध्ये नऊ डब्यांची लोकल कार्यान्वित झाली. 1986 मध्ये बारा डब्यांची लोकल सेवा सुरू झाली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी मध्य रेल्वेच्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले. यामुळं भारतातील रेल्वे प्रणाली अधिक कार्यक्षम, वेगवान आणि पर्यावरणपूरक बनली.
इलेक्ट्रिक रेल्वे सुरू होण्यासाठी लागली 46 वर्षे- विसाव्या शतकात मुंबई झपाट्यानं प्रगती करत होती. देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून कारागीर मुंबईत येत होते. त्यामुळं 20 व्या शतकाच्या सुरुवातीस मुंबईत जलद आणि कार्यक्षम प्रवासाची गरज निर्माण झाली. त्यासाठी इंग्रज सरकारनं इलेक्ट्रिक रेस रेल्वेचा प्रस्ताव मांडला. इलेक्ट्रिक रेल्वेची पहिली सुरुवात जर्मनीत झाली. जर्मनीनं 1879 मध्ये पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरू केली. भारतात हा बदल घडण्यासाठी 46 वर्षे लागली. त्यामुळं इलेक्ट्रिक रेल्वे सुरू करणारा भारत जगातील 24 वा आणि आशियातील तिसरा देश बनला. मुंबईतील रेल्वेच्या विद्युतीकरण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर, दक्षिण आणि पूर्व भारतातील विद्युतीकरण करण्यास सुरुवात झाली. 1931 मध्ये दक्षिण भारतातील मद्रास म्हणजे आताचे चेन्नई – तांबरम मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आलं. देश 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण देशभरात 388 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाची विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. त्यानंतर 1950 मध्ये कोलकात्यात विद्युतीकरणाला गती मिळाली. पुढं डिसेंबर 1957 मध्ये हावडा ते शियोराफुली दरम्यान पूर्व भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग सुरू झाला.
विद्युतीकरणाचे फायदे : सध्याच्या घडीला विद्युतीकरणामुळं भारतीय रेल्वेला अनेक फायदे झाले आहेत. डिझेल इंजिनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक इंजिन स्वच्छ आणि कमी प्रदूषणकारी आहेत. त्यामुळं कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात घटलंय. वीज वापर 30 टक्के अधिक किफायतशीर ठरलाय. यातून रेल्वेचा वेग आणि सतत धावण्याची क्षमता वाढली आहे. आता भारतीय रेल्वेनं 2026 पर्यंत संपूर्ण देशभरातील रेल्वेमार्ग पूर्णतः विद्युतीकरण करण्याचा संकल्प केलाय. यासोबतच, भारतीय रेल्वे हरित ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर अधिक भर देत आहे. सौर आणि पवन ऊर्जेचा वापर अधिकाधिक करून वंदे भारत आणि बुलेट ट्रेनसारख्या हायस्पीड रेल्वेगाड्यांसाठी स्वच्छ ऊर्जा प्रणाली विकसित केली जात आहे. तसंच, रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलीय.
हेही वाचा -