नाशिक : अष्टपैलू क्रिकेटपटू रामकृष्ण घोषची आगामी आयपीएल 2025 च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज CSK संघात निवड करण्यात आली आहे. आयपीएल लिलावात 30 लाख या रकमेच्या बेस प्राइसवर चेन्नई सुपर किंग्जनं रामकृष्ण घोषला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं आहे. गेले दोन दिवस आयपीएल 2025 च्या हंगामासाठी क्रिकेट जगतातील सर्व नामवंत खेळाडूंचा लिलाव झाला. नाशिकच्या सुपुत्राचा महेंद्र सिंग धोनीच्या बलाढ्य संघात समावेश झाल्यानं क्रिकेटपटूंमध्ये मोठा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत आहे रामकृष्ण : रामकृष्ण सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघात खेळत आहे. 2022 सालीच पदार्पण करत त्यानं महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. सुरुवातीपासून नाशिकमध्ये क्रिकेटचे धडे गिरवलेला रामकृष्ण घोष यानं विविध वयोगटात नाशिकचं प्रतिनिधित्व केलं. गेली काही वर्षे तो पुण्यात खेळत आहे. मध्यमगती गोलंदाज आणि फलंदाज अशी ओळख असलेला रामकृष्ण घोष चालू हंगामातील विविध स्पर्धात आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवत आहे.
रणजी ट्रॉफीत ओडिशा विरुद्ध दाखवली अष्टपैलू चमक : चालू हंगामातील नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्र संघातर्फे ओडिशा विरुद्ध रामकृष्णनं अष्टपैलू चमक दाखवली. महाराष्ट्र संघातर्फे पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर येत रामकृष्णनं 13 चौकारांसह सर्वाधिक 80 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करत महाराष्ट्र संघानं सर्वबाद 162 धावा केल्या. उत्तरादाखल ओडिशानं पहिल्या डावात 200 धावा करून आघाडी घेतली. त्यात रामकृष्ण घोषनं आपल्या मध्यमगती गोलंदाजीनं 3 गडी बाद केले. दुसऱ्या डावात महाराष्ट्र संघानं 166 धावा केल्या, त्यात नवव्या क्रमांकावर खेळून देखील रामकृष्ण घोषनं पुन्हा सर्वाधिक 39 धावा केल्या. ओडिशानं दुसऱ्या डावात विजयासाठीच्या 129 धावा 7 गडी गमावून पार करुन तीन गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या डावात रामकृष्णनं 1 गडी बाद केला. ओडिशाच्या कटक येथील बारबती आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. रामकृष्ण घोषच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएल 2025 साठीच्या या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचं वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आणि सर्वांनी त्याचं अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
रामकृष्ण घोष हैदराबाद इथं खेळणार सामने : हैद्राबाद इथं होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेतील, नागालँड आणि केरळवरील विजयानंतर महाराष्ट्राचे बाकी सामने खेळवण्यात येत आहेत. यात 27 नोव्हेंबर - मुंबई, 29 नोव्हेंबर - आंध्र, 3 डिसेंबर - गोवा आणि 5 डिसेंबर - सैन्यदल असे सामने खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा :