शिर्डी (अहिल्यानगर) - संपूर्ण देशभरासह साईंच्या शिर्डीतही मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या 2024 वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. नवीन वर्षा निमित्तानं बंगळुरू येथील एका भाविकाच्या देणगीतून साई मंदिरासह परिसराला विविध रंगांचा फुलांची सजावट करण्यात आलीय.
सर्व भाविकांना साईंचे दर्शन मिळावे, यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं 31 डिसेंबर रोजी रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुल ठेवल्यानं लाखो भाविकांना रात्रीतून दर्शन घेता आलं. नवीन वर्ष साईंच्या दर्शनानं सुरू करण्यासाठी साई मंदिराच्या दर्शनबारीसह मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी साईदर्शनासाठी दिसून आली. अनेक भक्तांनी सरत्या वर्षात तर अनेकांनी नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनानं केल्याचं दिसून आलं.
साई भजने म्हणत नवीन वर्षाची सुरुवात- मंदिरात प्रवेश करता आला नाही, अशा साईभक्तांनी साई समाधी मंदिराच्या कळसाचं तसेच एल सीडी स्क्रिनवर साईंचं दर्शन घेत धन्यता मानली. रात्री बाराच्या दरम्यान साईमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहत साईनामाच्या गजरात नव वर्षाचं स्वागत केलंय. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहपत्नीक उपस्थित होते. साईनगरीत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आल. तासनतास रांगेत उभं राहात भाविकांनी नवीन वर्षाचा संकल्प साईबाबांना साक्षी ठेवत केलाय. रात्री 12 वाजता भाविकांनी मोठ्या प्रमाणात द्वारकामाई मंदिरा समोरही गर्दी केली होती. या वेळी साई भजने म्हणत बरोबर बाराचा ठोका होताच साईंचा जयघोष करत भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात शिर्डीत केली आहे.
सजावटीकरिता चार टन फुलांचा वापर- बंगळुरू येथील साईभक्त बी. ए. बसवराज गेल्या अनेक वर्षांपासून नवीन वर्षा निमित्तानं शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरासह परिसराला विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यासाठी देणगी स्वरुपात खर्च करतात. या वर्षीही वर्षीही बंगळुरू , दिल्ली, पुणे याचबरोबर हॉगकॉंग, थायलंड अशा देश-विदेशातून विविध रंगाची तब्बल चार टन फुले मागविण्यात आली. या फुलांनी साई मंदिरासह, द्वारकामाई, गुरुस्थान आणि मंदिर परिसराची सजावट करण्यात आलीय.
सहा दिवसांपासून सजावटीचं काम- साई मंदिरासह परिसराला नवीन वर्षा निमित्तानं फुलांची सजावट करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून बंगळुरू, पुणे येथील तब्बल 50 कारागीर काम करत होते. अखेर 31 डिसेंबर रोजी रात्री ही फुलांची सजावट पूर्ण झाली. या वर्षीच्या सजावटीतून आकर्षक मोर साकारण्यात आला. हे यंदाच्या सजावटीचं आकर्षण ठरले. साई मंदिराच्या खिडकीतून साईबाबांच्या मुर्तीचा चेहरा दिसणाऱ्या खिडकीला ही आकर्षक फुलांची खास सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर साई समाधी मंदिरातदेखील फुलांमध्ये "ओम साई राम" साकारण्यात आले. हे नाव पाहून मंदिरात आलेले भाविक 'ओम साई राम' नामाचा जय घोष करत होते.
- संपूर्ण शिर्डीच नव्या वर्षाच्या स्वागतात-साईबाबा संस्थानच्या वतीनं मंदिरासह परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आलीय. साई मंदिरावरील कळसालादेखील तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलीय. त्याचबरोबर नवीन वर्षांच्या निमित्तान शिर्डीतील हॉटेलल आणि इतर व्यावसायिकांनी विद्युत रोषणाई केल्याचं दिसून आलं. त्यामुळे संपूर्ण शिर्डीच नवीन वर्षाच्या आनंदात बुडाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा-