मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल 23 नोव्हेंबर रोजी समोर आला. या निकालानं सर्वांनाच धक्का बसला. निवडणूक पूर्व सर्वेतून जे अंदाज वर्तवण्यात आले, ते सर्व फोल ठरले. हा निकाल धक्कादायक असल्याचं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचं मत आहे. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पराभूत झाल्यानं आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाचं खापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर फोडलं जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी करणार ईव्हीएम विरोधात आंदोलन : महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झालेला पराभव गांभीर्यानं घेतला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी या पराभवाची कारणं शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसून येते. मंगळवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. दुसरीकडं मातोश्रीवर शिवसेना उबाठा पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. या दोन्ही पक्षांच्या बैठका स्वतंत्र झाल्या असल्या तरी या बैठकीत एकच सुरू होता, तो म्हणजे ईव्हीएम विरोध. तिकडं दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आगामी काळात काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेप्रमाणेच ईव्हीएम विरोधी अभियान सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये विसंवाद : मंगळवारी मुंबईत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उबाठाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या बैठका झाल्या. तर, आज काँग्रेसनं विजय आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार असून, नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा ईव्हीएम विरोधात एक सूर दिसून येतो. आता मतमोजणी होऊन चार दिवस उलटले असले तरी, या तीनही घटक पक्षांचा आपापसात कुठंही संवाद दिसून येत नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधी आंदोलन उभारणार असल्याचं म्हटले जात आहे. मात्र सध्या महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हेही वाचा :