नवी दिल्ली Rohit Sharma Big Statement : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी त्यानं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मानं T20 विश्वचषक 2024 च्या ऐतिहासिक विजयानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहितचा हा आवडता फॉरमॅट आहे. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार आगामी काळात आपल्या निर्णयावरुन यू-टर्न घेऊ शकतो की नाही, यावर त्यानं मोठं विधान केलं आहे.
निवृत्तीबाबत रोहितचं मोठं वक्तव्य :रोहित शर्मानं T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना जिंकताच या फॉरमॅटला अलविदा केला होता. रोहितशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता निवृत्तीनंतर यू-टर्न घेण्याबाबत बोलताना रोहित जिओ सिनेमावर म्हणाला, 'आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती हा एक विनोद बनला आहे. खेळाडू निवृत्तीची घोषणा करतात आणि मग पुन्हा क्रिकेट खेळायला येतात. भारतात असं घडलेलं नाही, भारतात हे क्वचितच पाहायला मिळतं, मी इतर देशांतील खेळाडू पाहत आलो आहे. तो आधी निवृत्तीची घोषणा करतो आणि नंतर यू-टर्न घेतो. त्यामुळं खेळाडू निवृत्त झाला की नाही हे समजत नाही. पण माझा निर्णय अंतिम आहे आणि मी अगदी स्पष्ट आहे. ज्या फॉरमॅटमध्ये मला खेळायला खूप आवडतं त्या फॉरमॅटला निरोप देण्याची हीच योग्य वेळ होती."