सातारा : पोलीस संरक्षण नाकारणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाच्या आग्रहास्तव प्रोटोकॉल म्हणून फक्त एक पोलीस गाडी आपल्या ताफ्यात घेतली आहे. परंतु, त्या गाडीनं ताफ्यात शेवटी राहायचं आणि शहरात, गावात सायरन वाजवायचा नाही, अशी सक्त सूचना त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पोलीस संरक्षणावरुन विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
...म्हणून पोलीस संरक्षण नाकारलं : साताऱ्यातील विलासपूरमध्ये आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पोलीस संरक्षणाची का गरज नाही, याचा जाहीर खुलासा केला. ते म्हणाले की, "आपण काही चुकीचं केलेलं नाही. कुणाचं काही घेतलेलं नाही. कुणाचं लाटलेलं नाही किंवा चोऱ्या-माऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळं मला संरक्षणाची गरज नाही," असं मी प्रशासनाला सांगितलं.
पोलीस गाडीचा सायरन वाजवायचा नाही : "प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव प्रोटोकॉल म्हणून फक्त एकच पोलीस गाडी ताफ्यात घेतली आहे. परंतु, ती गाडी पुढं नाही तर मागे असली पाहिजे. शहरात, गावात सायरन वाजवायचा नाही. नाही तर लोक म्हणतील, आधी एकटे फिरत होते. आता भोंगा वाजवत फिरतात. म्हणूनच आपण सुरुवातीला पोलीस संरक्षणच नको म्हणून कलेक्टर, एसपींना कळवलं होतं," असं मंत्री शिवेंद्रराजें यांनी यावेळी सांगितलं.
शिवेंद्रराजेंचा टोला नेमका कुणाला? : पोलीस संरक्षण आणि सायरनवरुन मंत्री शिवेंद्रराजेंचा टोला नेमका कुणाला, याची सध्या साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे. यापूर्वी मंत्र्यांच्या ताफ्याचा अनुभव सातारा जिल्ह्यानं घेतलेला आहे. भोंग्याचा अतिरेकही पाहिला आहे. त्यामुळंच शिवेंद्रराजेंनी आपल्या ताफ्यातील पोलीस गाडीचा सायरन वाजवायचा नाही, अशी सक्त सूचना केल्याचं म्हटलं जातंय.
हेही वाचा :