नवी मुंबई : उरण परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे संपूर्ण उरण परिसर हादरुन गेला. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून, ही घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली. दिनेश नितेकर असं त्या नराधमाचं नाव आहे.
काय आहे प्रकरण : पीडित मुलीच्या आईनं मोरा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 13 जानेवारीला पीडित चिमुकलीच्या आईनं चिमुकलीला शेजारच्या अंगणवाडीत सकाळी 11 च्या सुमारास सोडलं. यानंतर दुपारी 1 वाजता तिला घरी आणलं. त्यानंतर पीडित मुलीची आई कपडे धुण्यासाठी घरात गेली. यावेळी पीडित मुलगी अंगणात खेळण्यासाठी रडू लागली. मुलगी घराबाहेर जाऊ नये, म्हणून आईनं दार बंद करुन पीडित मुलीला घरात कोंडलं. यावेळी मुलगी का रडते? हे पाहण्यासाठी दिनेश नितेकर (50) तिथं आला. यावेळी मुलीला त्यानं रडण्याचं कारण विचारलं. त्यानंतर त्यानं मुलीला खेळण्यासाठी अंगणात सोडलं. काही वेळानं पीडित मुलीची आई काम आटोपून आली. यावेळी आईला चिमुकली दिसली नाही. यामुळे त्यांनी आपल्या मुलीची चौकशी केली. मुलीच्या आईनं दिनेश नितेकर याला मुली संदर्भात विचारणा केली असता, मुलगी गल्लीत खेळत असल्याचं त्यानं सांगितलं.
चिमुकली आईला बिलगून जोरजोरात रडायला लागली : आईनं गल्लीत शोध घेतला परंतु, मुलगी दिसत नसल्यानं तिनं दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली. यावेळी दिनेशनं पीडित मुलगी कुठं आहे हे सांगितलं. पीडित मुलीची आई तिला आणण्यासाठी गेली असता, मुलगी घाबरुन आईला बिलगून जोर-जोरात रडू लागली. आईनं उचलून तिला घरी आणलं. तिला ताप भरल्यानं तिला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला औषध देऊन घरी जाण्यास सांगितलं.
मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड : तीन दिवसानंतरही मुलीचा ताप उतरला नाही, तसेच मुलगी घाबरली होती. त्यामुळे आईनं आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, नराधम दिनेशनं तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचं चिमुकलीनं सांगितलं. त्यामुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी तिला उरणमधील हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी पीडित मुलीची पूर्ण तपासणी करुन गुप्तांगावर जखमा असल्याचं लेखी पत्रच दिलं. त्यानंतर आईच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं थेट मोरा सागरी पोलीस ठाणे गाठून या बाबत दिनेश निवेतकर याच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या जबाबावरुन दिनेशच्या मुसक्या आवळल्या असून, आरोपी दिनेश हा पोलिसांच्या ताब्यात आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 62 (2), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम-4 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम-6 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
डॉक्टर बलात्कार खून प्रकरण : संजय रॉयला जन्मठेप, 'या' कारणानं नाही ठोठावली न्यायालयानं फाशी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी पती-पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी