मुंबई : "इंडिया गॉट लेटेंट" या शोमध्ये विनोद करताना आक्षेपार्ह विधाने करण्याचा आरोप असलेले युट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांनी अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांसमक्ष जबाब नोंदविला. दोघेही महाराष्ट्र सायबर सेलच्या नवी मुंबई येथील कार्यालयात हजर झाले होते.
सायबर सेलच्या महापे येथील कार्यालयात दाखल : महाराष्ट्र सायबर सेलने रणवीर अलाहाबादिया याला समन्स बजावून २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगून सुरक्षेच्या कारणास्तव तो यापूर्वी हजर झाला नव्हता. मात्र, २४ फेब्रुवारीला तो नवी मुंबईतील महापे येथे महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात पोहोचला आणि जबाब नोंदविला. रणवीर अलाहाबाादिया आणि आशिष चंचलानी यांनी २४ तारखेला दुपारी सायबर सेलला संपर्क साधून आम्हाला जबाब नोंदवायचा आहे, असे कळविले होते. त्यानंतर ते सायबर सेलच्या महापे येथील कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी अलाहाबादिया याने काळ्या रंगाच्या मास्कने चेहरा झाकला होता.
जबाब नोंदविण्यात आला : रणवीर अलाहाबादिया याची चौकशी करण्यासाठी गुवाहाटी पोलिसांचे पथक त्याच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, त्याच्या घराला कुलुप पाहून पोलीस परतले होते. त्यानंतर सायबर सेलने त्याला समन्स बजावला होता. महाराष्ट्र सायबर सेल याप्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. रणवीर अलाहाबादिया याच्यासोबतच 'इंडिया गॉट लेटेंट' या शोच्या पॅनेलमध्ये असलेल्या आशिष चंचलानी याचाही जबाब नोंदविण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी एकूण ४२ जणांना समन्स बजाविण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस महानिरिक्षक यशस्वी यादव यांनी यापूर्वी दिली होती.
राखी सावंतचा जबाब २७ रोजी नोंदविणार : याप्रकरणात सायबर सेलने राखी सावंत हिलादेखील समन्स बजावला होता. तिला 27 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. २७ तारखेला तिचा जबाब नोंदविण्यात येईल. 'इंडिया गॉट लेटेंट'च्या वादग्रस्त शोमध्ये तिचा सहभाग नव्हता किंवा ती परीक्षक नव्हती. मात्र, एका भागामध्ये ती पाहुणी म्हणून सहभागी झाली होती.
हेही वाचा -