मुंबई - अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे कुटुंब सध्या सतत चर्चेत आहे. 16 जानेवारी रोजी सैफवर त्याच्या घरी हल्ला झाल्यानंतर सतत याप्रकरणी काही बातम्या ऐकायला मिळत आहे. चोरी करण्याच्या उद्देशानं एक चोर सैफच्या घरात घुसला होता. मात्र तो त्याच्या उद्देशात यशस्वी झाला नाही. चोराशी सामना करताना सैफ हा जखमी झाला. आता पोलिसांनी चोराला अटक केली आहे. या चोराचं नाव मोहम्मद शरीफुल शहजाद आहे. दरम्यान, मध्यरात्री अभिनेत्याला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटो चालकाला आता 11,000 रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याशिवाय चालकाचे सोशल मीडियावर अनेकजण कौतुक करत आहेत.
सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटो चालकाचं झालं कौतुक : 16 जानेवारी रात्र सैफ अली खानसाठी खूप भयानक होती. सैफवर चोरानं हल्ला केल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर सैफ त्याचा मुलगा तैमूरबरोबर रुग्णालयात गेला होता. त्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाचं नाव भजनसिंग राणा आहे. आता एका संस्थेनं ऑटो चालकाच्या कामाचे कौतुक करून त्याला 11,000 रुपयांचे रोख बक्षीस दिलंय. दरम्यान याप्रकरणी भजन राणा म्हटलं, "मला खूप अभिमान वाटत आहे. माझ्या आयुष्यात असं काही घडेल, हे मला वाटले नव्हते. या यशामुळे मला खूप आनंद मिळाला आहे."
पैसा जीवापेक्षा महत्त्वाचा नाही : भजन सिंग यांनी पुढं सांगितलं, "जेव्हा सैफ अली खान इमारतीतून बाहेर पडत होते, तेव्हा एका महिलेनं मला ऑटोसाठी बोलावलं होतं. त्यानंतर सैफ अली खान आले आणि माझ्या ऑटोमध्ये बसले. त्यांनी पांढरा कुर्ता घातला होता आणि ते रक्तानं माखले होते. त्यांना खूप वेदना होत होत्या. यानंतर त्यांनी मला लीलावती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं होतं. मी त्यांना आपत्कालीन वॉर्डमध्ये घेऊन गेलो. मी त्याच्याकडून पैसेही घेतले नाहीत. पैसा जीवापेक्षा महत्त्वाचा नाही. त्यांच्या मानेतून, हातातून आणि पाठीतून रक्त वाहत होते. ते उतरल्यानंतर मी माझी गाडी साफ केली." 16 जानेवारी रात्री ही खान कुटुंबासाठी खूप थरारक होती.
हेही वाचा :