अमरावती : 'गण गणात बोते' अर्थात प्रत्येकामध्ये परमेश्वर बघा अशा या मंत्राला आणि हा मंत्र देणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तीला कुठल्याही सीमा नाहीत. यामुळं थेट सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये शनिवारी (22 फेब्रुवारी) संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. लंडन शहरापासून ६० किमी अंतरावर असणाऱ्या इंग्लंडमधील ब्रॅकनेल परिसरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गजानन महाराज यू. के. परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सहभागी भाविक संत गजानन महाराजांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं बघायला मिळालं.
अभिषेक, नामजप आणि पालखी : शनिवारी सकाळीच संत गजानन महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यानंतर भाविकांनी 'गण गण गणात बोते' या मंत्रासह संत गजानन महाराजांचा नामजप केला. सामूहिक पारायणात अनेक भाविक सहभागी झाले. दुपारी १२ वाजता आरती झाल्यावर १ वाजता महाप्रसाद वितरीत करण्यात आला. विशेष म्हणजे शेगावला ज्याप्रमाणे महाप्रसादालय आहे, अगदी तशीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली.
पालखी सोहळा ठरला आकर्षण : सायंकाळी सहा वाजता संत गजानन महाराजाची पालखी काढण्यात आली. मराठमोळ्या वेशातील महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन संत गजानन महाराजांची पालखी काढली. यावेळी महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीतील लेझीम पथकानं सर्वांचं लक्ष वेधलं.
दहा वर्षांची परंपरा : "संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याची परंपरा गेल्या दहा वर्षांपासून इंग्लंडमध्ये सुरू आहे. गजानन महाराज यू.के. परिवाराच्या वतीनं हा सोहळा आयोजित केला जातो," अशी माहिती आयोजक परेश देशमुख यांनी दिली. तसंच गजानन महाराज परिवारात सहाशे सदस्य सहभागी असून आमचा हा परिवार दिवसेंदिवस वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवचरित्रावरही टाकला प्रकाश : "संत गजानन महाराज प्रकतदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर देखील प्रकाश टाकण्यात आला. इंग्लंडमधील आमच्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, यासह महाराष्ट्राची संस्कृती समजावी. यावर देखील भर देण्यात आला", असं भाविक मयूर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शेगाव मंदिर परिसरात भाविकांची गर्दी; राज्यभरातून १००१ भजनी दिंड्या शेगावात दाखल, पाहा व्हिडिओ
- संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरातून शेगावात परतली, दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी - Sant Gajanan Maharaj Palanquin
- शेगावच्या 'श्रीं'ची पालखी पंढरपूरकडं रवाना, 700 वारकऱ्यांचा सहभाग - Gajanan Maharaj Palkhi