कानपूर IND Beat BAN :कानपूरमध्ये भारतीय क्रिकेट संघानं असा चमत्कार घडवला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. भारतीय संघानं दुसरा कसोटी सामना जिंकून बांगलादेशचा 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला. अशा प्रकारे भारतानं घरच्या मैदानावर नवा इतिहास रचला. भारतानं पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय मिळवला होता आणि आता दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करुन मायदेशात मोठी कामगिरी केली.
सलग 18वा मालिका विजय : घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 18वा मालिका विजय आहे. मायदेशात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. या बाबतीत दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा आहे, ज्यांनी घरच्या मैदानावर सलग 10 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतानं गेल्या 12 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारतीय संघानं शेवटची कसोटी मालिका 2012 मध्ये घरच्या मैदानावर गमावली होती. तेव्हा इंग्लंडनं भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला होता. या मालिकेनंतर भारतीय संघानं घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. गेल्या 12 वर्षात भारतानं मायदेशात सलग 18 कसोटी मालिकेत विरोधी संघाचा पराभव केला आहे.
पावसाच्या व्यत्ययानंतरही विजय : कानपूर कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळं केवळ 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. यादरम्यान बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 107 धावा केल्या. पावसामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, मात्र चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला 233 धावांत गुंडाळलं. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चौथ्या दिवशी डावाची आक्रमक सुरुवात केली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान सांघिक धावसंख्या 50, 100 आणि 200 धावा करण्याचा पराक्रम केला. भारतानं पहिला डाव 285/9 धावांवर घोषित केला.
बांगलादेशचा 2-0 नं सफाया : दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशचा संघ केवळ 146 धावा करु शकला. त्यामुळं भारतीय संघाला विजयासाठी 95 धावांचं लक्ष्य मिळालं. शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय डावाची सुरुवात धमाकेदार झाली, पण रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलही 6 धावा करुन निघून गेला. यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी सावध खळी केली आणि अशा प्रकारे भारतानं सामना तसंच मालिकेवर कब्जा केला.
हेही वाचा :
- बांगलादेशला हरवताच भारतीय संघ WTC फायनलमध्ये? श्रीलंका की ऑस्ट्रेलिया कोणाशी होणार सामना? - WTC Point Table After IND beat BAN