सिंगापूर D Gukesh and Ding Liren : भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चिनचा गतविजेता डिंग लिरेन मंगळवारी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या सातव्या फेरीत आमनेसामने येतील तेव्हा सलग तीन गेम बरोबरीत सोडवून विजय संपादन करण्याचं त्यांचं लक्ष्य असेल. अनेक बुद्धिबळ तज्ज्ञांच्या नजरेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या 18 वर्षीय गुकेशला अद्याप आपली सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही आणि त्यानं अद्याप कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करणं योग्य मानलं नाही. दोन्ही खेळाडू सध्या तीन गुणांसह बरोबरीत आहेत.
पहिल्या गेम गमावल्यानंतर गुकेशचं पुनरागमन :पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळूनही गुकेशनं पहिला गेम गमावला होता. परंतु दुसरा गेम या भारतीय खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणारा होता कारण चीनच्या खेळाडूनं विजयासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि सहज बरोबरी साधू दिली. लिरेनच्या चुकीचा फायदा घेत गुकेशनं तिसरा गेम जिंकून चांगलं पुनरागमन केलं, मात्र यानंतर पुढील तीन गेममध्ये एकाही खेळाडूनं जोखीम पत्करणे योग्य मानले नाही आणि आपसात गुणांची विभागणी केली.
पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार गुकेश :हा सामना 14 फेऱ्यांचा आहे आणि जो खेळाडू प्रथम 7.5 गुण मिळवेल तो विश्वविजेता होईल. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ दाखवला आहे, ते पाहता कोणीही प्रबळ दावेदार मानता येणार नाही. गुकेश मंगळवारी पांढऱ्या मोहऱ्यांसह सातवा सामना खेळेल. चीनच्या खेळाडूवर दडपण आणण्यासाठी तो याचा फायदा घेऊ इच्छितो. गुकेश पुढील तीनपैकी दोन गेम पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार असून त्याला जगज्जेतं होण्याच्या दिशेनं भक्कम पावलं टाकायची असतील तर त्याला या सामन्यांमध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. सातवा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
काय आहेत नियम :या चॅम्पियनशिपमध्ये 14 शास्त्रीय खेळ होणार आहेत, ज्यापैकी प्रत्येक सामना 4 तासांपेक्षा जास्त काळ खेळला जाऊ शकतो. या स्पर्धेत खेळणारा प्रत्येक अव्वल खेळाडू 7.5 गुण आणि विजेतेपद मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेणार आहे. कोणत्याही कारणास्तव सामना बरोबरीत राहिल्यास, रोमांचक वेगवान आणि ब्लिट्झ गेमद्वारे विजेता घोषित केला जाऊ शकतो. यात 3 मिनिटांच्या रॅपिड फायर राउंड्स असू शकतात.
हेही वाचा :
- 6 षटकार, 4 चौकार, 186.21 चा स्ट्राइक रेट... मुंबईकर आयुष म्हात्रेचं युएईत वादळ
- 15.5 ओव्हर बॉलिंग 5 धावा अन् 4 विकेट... करेबियन गोलंदाजानं क्रिकेटमध्ये लिहिला नवा अध्याय