सिडनी Cricket Australia Test Team of The Year : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सध्या जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे. त्यानं आपल्या कर्णधारपदाखाली अनेक यश संपादन केलं आहे. केवळ कसोटी क्रिकेटमध्येच नाही तर वनडे क्रिकेटमध्येही त्यानं आपल्या देशासाठी ट्रॉफी जिंकल्या आहेत. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघानं 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे विश्वचषक जिंकला होता. तो सर्वोत्कृष्ट कर्णधार असू शकतो परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियानं निवडलेल्या 2024 च्या सर्वोत्तम कसोटी खेळणाऱ्या 11 खेळांडूंमध्ये त्याला स्थान मिळालेलं नाही.
बुमराहला केलं कर्णधार :क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 2024 संपण्याच्या एक दिवस आधी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवलं आहे. बुमराहनं सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोकादायक गोलंदाजी केली आहे. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं 4 कसोटी सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत, त्यानं तीन वेळा 5 विकेट्स (इनिंगमध्ये 5 किंवा अधिक विकेट्स) पूर्ण केल्या आहेत.
बुमहारसह जैस्वालचा संघात समावेश :2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीसाठी इंग्लंडला पात्र ठरण्यात अपयश आलं असलं तरी, संघात त्यांच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसून येतं. सलामीवीर फलंदाज बेन डकेट, अनुभवी जो रुट आणि युवा फलंदाज हॅरी ब्रूक यांना स्थान मिळालं आहे. बुमराह व्यतिरिक्त, प्लेइंग-11 मधील दुसरा भारतीय खेळाडू यशस्वी जैस्वाल आहे. बुमराहनं यावर्षी 13 सामन्यात 14.92 च्या सरासरीनं 71 विकेट घेतल्या आहेत. यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे.