सेंट किट्स BANW Beat WIW by 60 Runs :बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना 21 जानेवारी रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं खेळवण्यात आला. या सामन्यात पाहुण्या बांगलादेशनं वेस्ट इंडिजचा 60 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे बांगलादेशच्या महिला संघानं क्रिकेटच्या इंतिहासात वेस्ट इंजडिजला पहिल्यांदाच कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत केलं आहे.
कॅरेबियन संघ स्वतात बाद : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघ 184 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 124 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरनं शानदार कामगिरी केली. नाहिदा अख्तरनं 10 षटकांत 31 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले आणि फलंदाजीत 9 धावांचं योगदान दिलं. नाहिदाला तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मालिकेचा विजेता ठरवेल.
बांगलादेशची प्रथम फलंदाजी : वेस्ट इंडिजच्या महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेशला सुरुवातीलाच 34 धावांवर धक्का बसला. यानंतर बांगलादेशनं ठराविक अंतरानं विकेट गमावल्या आणि 48.5 षटकांत 184 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून निगार सुलतानानं कर्णधारपदाची खेळी केली. निगार सुलतानानं 120 चेंडूत 68 धावा केल्या. तर शोभना मोस्टारीनं 23 आणि शोर्ना अख्तरनं 21 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहारॅकनं 10 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. करिश्मा रामहारॅक व्यतिरिक्त, आलिया अॅलेननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.