पालघर Yogi Adityanath Palghar Sabha Speech : पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना योगी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाचं लोकार्पण केलंय. त्यामुळं या देशात मोदींची सत्ता येण्यापासून रोखण्याची हिम्मत कोणाही ‘माय का लाल’मध्ये नाही. मोदी हे खरे रामभक्त असून या निवडणुकीत भाजपाला चारशेहून अधिक जागा मिळतील", असा विश्वास योगींनी व्यक्त केला. "भाजपाला चारशेहून अधिक जागा मिळण्याच्या शक्यतेमुळं ‘इंडिया’ आघाडी चे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, लालूप्रसाद यादव या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलीय. त्यामुळं ते काहीही बोलत असले, तरी त्यांच्याकडं लक्ष येऊ नका. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं विसर्जन करावं लागेल," असा इशाराही योगींनी दिला.
उत्तर प्रदेश-महाराष्ट्राचं वेगळं नातं :पुढं ते म्हणाले की, "उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं आहे. काशीमध्ये मराठा घाट असून महाराष्ट्रातील भोसले राज्यकर्त्यांनी तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी काशीचे गागाभट्ट आले होते. त्यामुळं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे परस्परांशी नाते आहे. कुणी काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे धडे प्रत्यक्षात आणणाऱ्या पंतप्रधान मोदींना निवडून देण्यासाठी महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजवावी", असं आवाहनही त्यांनी केलं.