ठाणे : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यासह एका गुंडाचा मुद्दा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदेच्या दिल्ली अधिवेशनात उपस्थित केला. तसंच यावेळी त्यांनी भिवंडीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. यानंतर आता पोलीस प्रशासनानं भिवंडीतील नामचीन गुंड सुजित पाटील उर्फ तात्या याचा शोध घेऊन त्याला इगतपुरीमधून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंड सुजित पाटील उर्फ तात्या याच्यावर भिवंडीतील विविध पोलीस ठाण्यात एकून 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच एका गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं चार वर्ष तो तुरुंगामध्ये होता. मात्र, तुरुंगामधून पॅरोलवर बाहेर आल्यावरही त्यानं काही गुन्हे केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
भिवंडीत बीड, परभणी सारख्या घटना : भिवंडीतील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला गुंड सामाजिक कार्यक्रमात राजरोसपणे फिरत असल्यानं भिवंडीतील गुन्हेगारी वाढली आहे. भविष्यात भिवंडीत बीड आणि परभणी सारख्या घटना घडण्याची शक्यता खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केली होती. खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मागणीनंतर गुंड सुजित पाटील उर्फ तात्या याला पोलिसांनी इगतपुरीमधून अटक केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. यापुढं मतदारसंघातील वाढत्या ड्रग्स माफियांवर कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत- सुरेश म्हात्रे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार)
तीन दिवस पोलीस कोठडी : सुजित पाटील उर्फ तात्या याला स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या पोलीस पथकानं शनिवारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून सापळा रचून अटक केली आहे. अटकेनंतर आरोपी सुजित पाटील याचा ताबा भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांकडं देण्यात आला. आरोपीस शनिवारी भिवंडी न्यायालयात हजर केलं असता त्याला सोमवारपर्यंत (10 फेब्रुवारी) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, "अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 307 चा गुन्हा दाखल आहे. तो या गुन्ह्यात फरार होता. तेव्हापासून पोलीस पथक त्याचा समांतर तपास करत होते. असं असतानाच ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं इगतपुरीमधून त्याला अटक करत आमच्या स्वाधीन केलं."
हेही वाचा -