कोल्हापूर Lok Sabha Election : राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली असून अवघ्या देशाचं लक्ष आता 4 जूनच्या दिवसाकडं लागलंय. केंद्रातील सत्ताधारी भाजपानं 400 लोकसभा जागा जिंकणारच असा चंग बांधलाय. तर विरोधी 'इंडिया' आघाडी आम्हीच देशाचं सरकार बनवणार असा दावा करत आहे, राज्यातील अनेक जागांपैकी जी लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरली त्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली, यात त्यांनी हातकणंगलेमधून लाखांच्या मतफरकानं विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास जनता है : हातकणंगले लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडलं असून महायुती, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात प्रामुख्यानं शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात महायुतीकडून धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर असा अटीतटीचा सामना झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळावा यासाठी दोन वेळा राजू शेट्टींनी प्रयत्न केले. मात्र, अखेरच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला. या जागेवर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरुडकर) यांनी आपल्या लोकसंपर्काच्या बळावर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचा धडाका लावला होता. एकीकडं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी तगड्या नेत्यांची फौज मैदानात उतरली होती तर महाविकास आघाडी उमेदवाराच्या मागंही शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांच्यासारखे नेते प्रचाराची धुरा सांभाळत होते. दोन्ही युती आघाड्यांशी समझोता न झाल्यानं 'एकला चलो रे'ची भूमिका घेतलेल्या राजू शेट्टी यांनी मात्र सामान्य शेतकरी कार्यकर्ते यांच्या संघटनेतून यंदा कोणत्याही परिस्थितीत विजयी गुलाल खेचण्यासाठी प्रयत्न केले. महायुतीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री होते याचं आव्हान वाटलं नाही का, असा सवाल केल्यानंतर राजू शेट्टी यांनी "तुम्हारे पास पीएम, सीएम, मिनिस्टर्स है, तो मेरे पास जनता है" असा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील डायलॉग म्हणत निकाला आधीच मतदार संघात रंगत वाढवली.