महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरुन विखे पिता-पुत्रांची वेगवेगळी भूमिका; जाणून घ्या कोण काय म्हणालं? - SHIRDI SAI TEMPLE FREE MEALS

शिर्डीतील साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरून भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात एकमत नसल्याचं पाहायला मिळतय.

Radhakrishna Vikhe Patil reaction on Sujay Vikhe Patil statement regarding shirdi sai temple free meals
राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 7:43 AM IST

अहिल्यानगर : शिर्डी येथील साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावे, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. तसंच "अख्खा देश इथं येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथं गोळा झालेत", असंही ते म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील? : शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलत असताना सुजय विखे पाटील म्हणाले की, "अख्खा देश साईबाबांच्या भोजनालयात येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथं गोळा झालेत. हे योग्य नाही. त्यामुळं साईबाबा संस्थाननं भोजनालयातील मोफत जेवण बंद करून सशुल्क करावं", अशी मागणी त्यांनी केली. तसंच यावर ग्रामस्थांची बैठक घेऊन वेळ आली तर आंदोलन देखील करू, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला.

साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत भोजनावरुन विखे पिता-पुत्रांची वेगवेगळी भूमिका (ETV Bharat Reporter)

अन्नदानासाठी साडेचारशे कोटींहून अधिक निधी : "सुजय विखे पाटलांनी केलेलं वक्तव्य दृष्टीनं त्यांच्याबरोबरीनं वक्तव्य आहे. मी हेच सांगेल की साईभक्त त्याठिकाणी पैसे जमा करत असतात. साई संस्थानवर लोड येऊ नये म्हणून साई संस्थाननेच एक योजना आणली होती. कुणी अन्नदान करत असेल तर त्यांच्या नावानं फलक लावून साई भक्तांना मोफत जेवण देण्यात यावं. देणगीदार साई भक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवले तर त्याचा आर्थिक बोजा संस्थानवर नाहीय. साई संस्थानकडं साडेचारशे कोटींहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही", असं साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले? : सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला करण्यात आला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं. सुजय विखेंनी वापरेल्या शब्दानं भावना भावना दुखावल्या असतील, हे मी मान्य करतो. परंतु, भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळालं पाहिजे. शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. साई भक्तांच्या देणगीतूनच महाप्रसाद दिला जातो. तो निरंतर चालू राहणार आहे."

शिवसेनेचे समर्थन : "सुजय विखे पाटलांनी जी भूमिका भाषणातून मांडली, त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. पूर्वीपासून आम्हीदेखील मागणी करत होतो की, साई भक्तांनी दिलेल्या दानाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं साई संस्थाननं करावा. साई संस्थान प्रसादालयातील मोफत प्रसाद काही लोक जेवण म्हणून घेतात. त्याचा दुरुपयोगदेखील होतो. शिर्डीत गुन्हेगारीचं प्रमाण आणि भिक्षेकरुंची संख्या वाढत आहे. कोणतीही गोष्ट मोफत असू नये. साई संस्थानच्या प्रसादालयातील भोजनाला मोल असावं", असं शिवसेनेचे पदाधिकारी कमलाकर कोते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा -

  1. अर्ध्या तासात गुंड जमा, सुजय विखेंवरील प्राणघातक हल्लाचा मास्टमाईंड कोण? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल
  2. विखे विरुद्ध थोरात वाद : संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा संपूर्ण आढावा
  3. "तालुक्याचा बाप कोण? जनताच दाखवून देईल"; सुजय विखेंचं जयश्री थोरातांना प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details