मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा वाढला असून, हिवाळा असल्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडी परतलीय. दरम्यान, मुंबईत मागील काही दिवसांपासून मुंबईत हवेतील गुणवत्ता खालावल्यामुळं प्रदूषणात वाढ झालीय. परिणामी, या प्रदूषणामुळं मुंबईसह उपनगरात विविध आजारांना लोकांना सामोरं जावं लागतंय. पण हे आजार सध्या हिवाळा, प्रदूषण, वातावरणातील बदल, हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे होत असल्याचं समोर आलंय. परंतु जर आपण तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर या आजारावर मात करू शकतो, असंही आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलंय.
विविध आजारामुळं मुंबईकर त्रस्त : दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात हवेतील गुणवत्ता खालावली आहे. मुंबईतील सायन, बोरिवली, दादर, भांडुप, लोअर परेल, माझगाव, कुलाबा, वरळी आदी ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी हवेतील गुणवत्ता खालावल्याचे चित्र होते. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेतील गुणवत्ता खालावल्यामुळं हवेची वाईट नोंद झालीय. हवेतील गुणवत्ता खालावल्यामुळं वातावरणावर परिणाम दिसून येतोय. परिणामी वातावरणातील प्रदूषणात वाढ होत आहे आणि यामुळं सध्या मुंबईकरांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय.
रुग्णालयात रुग्णांची 15 ते 20 टक्क्यांनी वाढ : या आजारात लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताहेत. वारंवार सर्दी, सतत खोकला, श्वसनाचा त्रास, घसा दुखणे, नाक गळणे इत्यादी आजार मुंबईकरांना होताना दिसताहेत. या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं खासगी, सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात याचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. "सध्या थंडी आहे, त्यामुळं सर्दी, खोकला, श्वसनाचे त्रास या आजाराचे रुग्ण आमच्या रुग्णालयात 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय."
काळजी कशी घ्याल...? : वातावरणातील बदलामुळं आणि वाढत्या प्रदूषणाचा जास्त परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर होताना दिसतोय. ज्येष्ठ नागरिकांना घशाचा आणि श्वसनाचा त्रास जाणवतोय. विशेष म्हणजे जे दम्याचे रुग्ण आहेत किंवा ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्या लोकांना घशामध्ये खवखव किंवा घशाचा अधिक त्रास जाणवतोय. प्रदूषण वाढण्यास विविध कारणे आहेत. गाड्यांमधून आणि रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारा धूर आणि मुंबईत मोठ्या इमारतींच्या प्रकल्पाचे काम सुरू असल्यानं प्रदूषण वाढलंय. यातील धुळीचे आणि हवेतील बारीक कण शरीरात प्रवेश करतात. यामुळं श्वसनाचा त्रास जाणवतो, खोकला, खवखव आणि न्यूमोनियादेखील होऊ शकतो. याव्यतिरिक्त फुफ्फुसाला सूज येणे हे प्रकार वाढताहेत. या आजाराला सामोरं जाण्यासाठी बाहेर जातेवेळी तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. मुलांना शाळा-कॉलेजमध्ये पाठवताना तोंडाला मास्क लावूनच पाठवले पाहिजे. विशेष म्हणजे पाणी उकळून किंवा कोमट करून प्यायले पाहिजे. हे करूनही बरे नाही वाटले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असं आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवेंनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सल्ला दिलाय.
हेही वाचा :