नागपूर : सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी दररोज लाखो भाविकांचा महापूर आलेला दिसतो. कुंभमेळ्यातल्या लाखांच्या गर्दीत अनेकजण आपल्या आप्तजनांपासून दुरावतात, या गंभीर विषयावर अनेक मिम्स पाहायला मिळतात. मुळात हा विषय गमतीचा नाहीच. प्रत्यक्षात लाखोंच्या गर्दीत आपलं कोणी हरवतं, तेव्हा त्या कुटुंबाची होणारी अवस्था कल्पनेपलीकडची असते. आपलं माणूस गर्दीत गमावणं म्हणजे काय हे नागपूरमधील आश्राप्पा रामप्पा बेदरे यांना विचारा. संवेदनशील माणसाच्या काळजात चर्र होईल. आताच्या काळात कोण कोणाला सांभाळायला तयार नसतं. मुलांसाठी आई, बाप ओझं झालेत तर भावाचं काय घेऊन बसलात! पण नागपुरातील आश्राप्पा बेदरे हे गेल्या साडे तीन महिन्यांपासून जिवाचं रान करुन आपल्या ४८ वर्ष वयाच्या मनोविकारग्रस्त भावाचा शोध घेत आहेत. त्यांनी पोलिसांकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तरीही हार न मानता आपल्या लहान भावाला शोधून काढण्यासाठी ते केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील सर्व जिल्हे वारंवार पिंजून काढत आहेत. या शोधादरम्यान मनात येणारे वेगवेगळे विचार सांगताना डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंचा बांध त्यांना थोपवता येत नाही.
तहान-भूक विसरून लहान भावाचा शोध : आश्राप्पा बेदरे. वय वर्ष ६२. जणू पायाला भिंगरी लावल्यागत ते नागपूर शहरातील कानाकोपऱ्यात आपल्या लहान भावाचा शोध घेत आहेत. आश्राप्पा बेदरे यांचा भाऊ गेल्या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता. बेदरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी आहेत. मात्र, भावाचा शोध घेण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते तहान-भूक विसरून वणवण भटकत आहेत.
"गेल्या तीन महिन्यापासून नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे आश्राप्पा यांना सोबत घेवून मिसिंगचा शोध घेत आहेत. तरीही एखाद्या मिसिंगमध्ये जितका तपास होत नाही, त्यापेक्षा अधिक तपास या प्रकरणात पोलिसांनी केला. इतरही विभागांमार्फत मिसिंग असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे फोटो प्रकाशित केलेत. बेवारस व्यक्तींचा शोधही घेण्यात आला. अनेक बेवारस लोकांना आश्रय देणारे आश्रम, रुग्णालयं अशासह अनेक ठिकाणी शोध अजूनही सुरू आहे. पोलीस आपले प्रयत्न करत आहेत." : पोलीस उपायुक्त राहुल मदने
२९ ऑक्टोबरला नेमकं काय घडलं होतं? : ओंकार बेदरे असं त्यांच्या हरवलेल्या भावाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून आश्राप्पा यांच्या मोठ्या मुलावर आणि लहान भावावर नागपुरात उपचार सुरू होते. त्या दोघांना घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्यामुळं आश्रप्पा नागपुरात आले. २९ ऑक्टोबरला मनोरुग्णालयातून सुट्टी मिळाल्यामुळं ते ओंकारला आणि त्यांच्या मुलाला घेऊन बुलढाण्याला जाणार होते. सीताबर्डीत ऑटो रिक्षातून उतरल्यानंतर भावाचा हात धरून ते पोलीस ठाण्यासमोरून जात होते. यावेळी दिवाळीच्या खरेदीसाठी सीताबर्डीत प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीत गाडी बघत असताना काही क्षणासाठी आश्रप्पांच्या हातातून ओंकारचा हात सुटला अन् घात झाला. त्यांनी आसपास विचारपूस केली. मात्र, त्याचा पत्ता लागलाच नाही. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, यावेळी सीसीटीव्हीत गर्दीमुळं काहीच लक्षात येत नसल्याचं सांगून पोलिसांनी त्यांची बोळवण केली. त्यानंतर आश्राप्पा यांनी स्वत:च आपल्या भावाचा शोध सुरू केला.
प्रत्येक पिढीतील एक सदस्य होतो मनोविकारग्रस्त : आश्राप्पा बेदरे यांच्या कुटुंबाची निराळी व्यथा आहे. बेदरे कुटुंबाच्या प्रत्येक पिढीतील एक तरी सदस्य हा मनोविकारांनी ग्रस्त असतो. सुरुवातीला आश्राप्पा यांची आई मनोविकारग्रस्त झाली. त्यानंतर त्यांचा भाऊ ओंकार आणि आश्राप्पा यांचा मोठा मुलगा देखील मनोविकारग्रस्त झाला. थोडक्यात काय. तर नियतीनं सर्व बाजूंनी कोंडी केली आहे. पण आश्राप्पा बेदरे हे सक्षमपणे आपल्या लहान भावाचा शोध घेत आहेत. आपल्याला पोलीस प्रशासनाची अधिक मदत मिळाली तर आपण भावापर्यंत पोहोचू शकू, अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंही त्यांनी आपल्या भावाला शोधून देण्याची मागणी केलीय. आश्राप्पा यांचा भाऊ वयाच्या पन्नाशीच्या आसपास असला तरी मनोविकारग्रस्त असल्यामुळे त्याला स्वतःच्या घरचा पत्ता सांगता येत नाही. आपल्यापुरता विचार करणाऱ्या लोकांच्या गर्दीत आपल्या मदतीला एकतरी चांगल्या वृत्तीचा माणूस येईल, या आशेवर आश्राप्पा यांनी भावाचा शोध सुरु ठेवला आहे.
हेही वाचा -