मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी अखेर शिवसेनेला (उबाठा) धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता आज (13 फेब्रुवारी) साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कोकणात ‘ऑपरेशन टायगर’? : विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election) पराभवानंतर नाराज असलेले राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु, त्यांनी शिवसेनेची कास धरण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणात शिवसेनेला (उबाठा) हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळं कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरु लागलीय.
राजन साळवी यांचा राजकीय प्रवास : १९९३ -९४ च्या सुमारास राजन साळवी हे शिवसेनेत (उबाठा) सक्रिय झाले. इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे (उबाठा) नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे (उबाठा) तत्कालीन नेते नारायण राणे यांच्या सहकार्यानं त्यांनी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख पदही (१९९५-२००४) मिळवलं होतं. त्यानंतर २००६ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, २००९ मध्ये याच मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा ते शिवसेना (उबाठा) पक्षातून आमदार झाले. शिवसेनेत फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचं (उबाठा) उपनेता केलं होतं. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी पराभव केला होता. त्यानंतर राजन साळवी पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.
भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया : राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना (उबाठा) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. "राजन साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. तसंच साळवींचा भाजपा प्रवेश कोणी थांबवला, कोणी खोडा घातला याची मला कल्पना नाही. मात्र, आता सुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं मला वाटतं," असा टोला जाधव यांनी लगावला.
हेही वाचा -