जालना : राज्य सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी कौतुक केलं. मात्र यावेळी त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टोला लगावला. "सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ दिली, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचं मी कौतुक करतो. शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, आता मनुष्यबळ देखील द्या," अशी मागणीही मनोज जरांगे यांनी यावेळी केली. "15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही, हे उद्या अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मंत्री उदय सामंत यांचा सल्ला मी ऐकला आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. मनोज जरांगे हे जालना इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
शिंदे समितीला सरकारची मुदतवाढ : खरं तर ही चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल सरकारचा कौतुक आहे. एखादी गोष्ट केली, तर आम्ही केलंच म्हणणार आहे. आम्ही ज्याच्या वेळेस बोलतो, त्यावेळेस आमच्या पाठीमागे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं हित असते. तुम्ही जाणून-बुजून वेळ लावता आणि आम्ही गप्प का बसलो हे सुद्धा आज सांगतो, असं मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं. "मित्र म्हणून सल्ला आहे, मनोज जरांगेंनी संयम पाळावा, असं मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्यं केलं. त्यांचा सल्ला मी मान्य केलेला आहे. आम्ही शांत झालो, आम्ही सन्मानानं सरकारला सहकार्य करत आहोत, हे ओळखून घेतलं पाहिजे. शेवटी समाजाच्या लेकरांच हित महत्त्वाचं असते. आपल्या पूर्ण मागण्या आठ होत्या. त्यामधल्या चार तत्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं."
शिंदे समितीला मनुष्यबळ द्या ? : सरकारनं शिंदे समितीला मुदत वाढ दिली, आता या समितीला मनुष्यबळ द्या, अशी आमची सरकारला विनंती आहे. या समितीला बसवून ठेवू नका, फक्त मुदत वाढ देऊन उपयोग नाही. या समितीनं आता महाराष्ट्रभर जाऊन नोंदी शोधल्या पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. समितीला कक्ष देऊन मनुष्यबळ तातडीनं दिलं पाहिजे. या समितीला निधी कमी पडता कामा नये. हैदराबाद गॅझेट लागू करतो, असं तुम्ही शासन निर्णयात सांगितलं. बॉम्बे गव्हर्मेंट आणि सातारा संस्थान हे आता शिंदे समितीकडं आहे. आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे. गॅझेटचा अभ्यास शिंदे समितीनं केलेला आहे. आता तो सरकारला करायचा आहे. त्यामुळे गॅझेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही आता पाहतोय, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
साखळी उपोषणाला बसणार का ? : आम्ही 15 तारखेला उपोषणाचं ठरलं होतं. मात्र आज संध्याकाळी गावकरी आणि आम्ही ठरवणार आहोत. त्यामुळे उद्या सकाळी आंतरवली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू. आता सरकरा मागण्या मान्य करायला लागले, म्हणून आम्ही सुद्धा बोलणार नाही. फक्त तुम्ही खोटं करू नका हे आमचं मागणं आहे. तुम्ही मराठा आंदोलन म्हणून कुणालाही नोटीस देऊ शकत नाही. दुसरं काही प्रकरण असेल तर ठीक आहे. परंतु मराठा आंदोलन म्हणून मी खपवून घेणार नाही. काल जो निर्णय घेतलाय त्यावरून सरकारचा सकारात्मक निर्णय आहे, असं वाटत आहे. पुढच्या मंगळवारपर्यंत ते मागण्या मान्य करतील, असा विश्वास त्यांच्यावर ठेवूया. आम्ही कोणाचे दुश्मन नाही, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :