मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरत रान उठवलंय. या परिस्थितीत आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
'एक्स'वरील पोस्टमध्ये काय म्हणाले? : शरद पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिन्याभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला एवढा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळं या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येते."
"बीड-परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्यात. त्यामुळं या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. तसंच त्यासाठी ते सातत्यानं शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे", अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याची माहिती शरद पवार यांनी दिलीय.
शरद पवार पत्रात नेमकं काय म्हणालेत? : शरद पवार पत्रात म्हणाले आहेत की, “मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडानी अपहरण करून निर्घृण हत्या केली. या अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलनं उभी राहिलीत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे, अशी एकमुखानं मागणी करण्यात आली."
"सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसंच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार आणि घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांच्छन लावणाऱ्या या घटनेचा तातडीनं तपास व्हावा यासाठी प्रसारमाध्यमं देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
“संतोष देशमुख यांची माणुसकीला काळिमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्यानं त्या घटनांची पाळंमुळं खणून काढावीत अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्यानं उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसंच सदर मंचावरुन जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. आपणास विनंती की, सदर घटनेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसंच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे”, अशी मागणी शरद पवार यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मोठी कारवाई! बीड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, एसआयटीमधून दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
- "बीडमधील प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांकडून प्रोत्साहन...", पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर निशाणा
- संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'