जळगाव : महायुती सरकारमधील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा एकनाथ खडसेंनी समाचार घेतला. अजित पवारांनी 'मतं दिली म्हणजे तुम्ही माझे मालक नाहीत' असं विधान केलं होतं. 'आता हे सारे निवडून आलेत, त्यामुळं गरज सरो आणि वैद्य मरो' अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेऊ नका : “निवडणुकीच्या दरम्यान सर्व मंत्र्यांनी हे वारंवार सांगितलं होतं की कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार नाहीl. मतदानासाठी यांनी सर्व नाटक केलं. लाडक्या बहिणींना आता तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे. एकवेळ पैसा दिला तर तो परत तर घेऊ नका. एक वेळ तुम्ही तो शब्द दिला आहे तो तरी पाळा”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
“उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कन्फ्युज म्हणजेच संभ्रमावस्थेत आहेत. त्यांची अस्वस्थता ही वेगवेगळ्या शब्दांमधून बाहेर येत आहे. आता सुद्धा मतदारांना त्यांनी जे सांगितलं आहे, हे त्यांच्या अस्वस्थतेतून बाहेर निघालेले शब्द आहेत”. - एकनाथ खडसे, आमदार
सुरेश धस आणि वाल्मीक कराड यांच्यावर आरोप : निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आता महिना उलटला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळून सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार व्हायला, खाते वाटप व्हायला उशीर झाला आहे. पालकमंत्री नसल्यामुळं आता जिल्ह्यात डीपीडीसी नाही. पालकमंत्री पद दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही. कारण त्यांना मनाप्रमाणे पालकमंत्री पद पाहिजे. जनतेला अपेक्षा होती की, यांच्याकडून काम होईल, लाडक्या बहिणींना मदत होईल, मात्र आता निर्णय वेगळे यायला लागले आहेत. यामध्ये सुरेश धस आणि वाल्मीक कराड यांच्यावरही आरोप झाले. यांची चौकशी झाली पाहिजे. मात्र यात जे दोषी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.
कॉल रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांकडं द्यावे : "अंजली दमानिया यांच्याबद्दल वाक्य न बोललेलं बरं, एका दिवसामध्ये त्यांना 800 कॉल आले. त्यांना जे कॉल आले त्यांनी ते कॉल रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांकडं द्यावे आणि त्याची तपासणी करावी. कॉल रेकॉर्डसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तर त्याची तपासणी होईल" असं एकनाथ खडसे म्हणाले.
हेही वाचा -
- "जामनेरला मुक्कामी राहून, मला पाडून दाखवा", गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना ओपन चॅलेंज - Girish Mahajan
- एकनाथ खडसे करणार भाजपा प्रवेश; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
- एकनाथ खडसे यांची भाजपाकडून घोर उपेक्षा! पक्षप्रवेश टांगणीलाच, काही वेळ वाट बघून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जोमानं काम करणार - Khadse neglected by BJP