ठाणे : चीनमधल्या नवीन विषाणूनं जगभरात पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. कोरोनानंतर हा विषाणू त्रासदायक होऊ शकतो, म्हणून सर्वच स्तरावर शासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. एचएमपीव्ही (HMPV) हा सामान्य विषाणू आहे. या विषाणूमुळं एकही बाधित रुग्ण ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात आढळून आला नसल्याची माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभाग अधिकारी डॉ. चेतना चौधरी यांनी दिली.
आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश : चीनमध्ये सध्या उद्रेक झालेल्या (HMPV) या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आजारी व्यक्तींच्या संपर्कात न येण्याचं तसंच कोणालाही हस्तांदोलन न करण्याचं आवाहन डॉ. चेतना चौधरी यांनी केलंय. भारतात नव्या एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबाबतीत काही सूचना दिल्या आहेत.
कशी घ्यावी काळजी : खोकला आणि शिंका वारंवार येत असल्यास टिश्यू पेपर किंवा रुमालाने आपलं तोंड झाकावं. एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा न वापरता नवीन वापरा, आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. तर सर्दी खोकला, तापाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्याचं टाळावं. खबरदारीचा उपाय म्हणून कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे १५ खाटांचा आयसोलेशन विभाग आणि अत्यावश्यक औषधांच्या साठ्यासह महापालिका आरोग्य विभाग सज्ज केल्याची माहिती डॉ. चेतना चौधरी यांनी दिली.
कोणतीही लस उपलब्ध नाही : यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, एचएमपीव्हीच्या आजारामध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. हस्तांदोलन आणि व्हायरसने दूषित वस्तूला स्पर्श केल्यानं या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. सध्या यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. यापूर्वी 2023 मध्ये, एचएमपीव्हीचे रुग्ण नेदरलँड, यूके, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि चीनमध्ये आढळून आले होते, अशीही माहिती डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा -