मुंबई - 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेल्या एका अश्लील कमेंटनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात, रणवीर अलाहाबादिया आणि शोचे परीक्षक असलेले कॉमेडियन समय रैना याच्यासह इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून रणवीर अलाहाबादियानं ताबडतोब एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लोकांची माफी मागितली, तर आता सुमारे ४ दिवसांनंतर, समय रैनानंही आपलं मौन सोडले आणि आपली बाजू मांडली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या समय रैनानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टेटमेंट शेअर केलं आहे आणि म्हटलंय की त्यानं त्याच्या चॅनेलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट' शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत आणि तो तपास अधिकाऱ्यांना 'पूर्ण सहकार्य' करत आहे. लोकांचे मनोरंजन करणं हे त्याचं एकमेव ध्येय असल्याचंही त्यानं सांगितलं.
समय रैनाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, "जे काही घडलं ते हाताळणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं. मी माझ्या चॅनेलवरुन इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणं आणि त्यांचा चांगला वेळ घालवणं हेच माझं मुख्य ध्येय होतं. मी सर्व एजन्सीजना त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करत आहे. आभारी आहे."
शोच्या अलिकडच्या भागात युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेली अश्लील कमेंट लोकांना आवडली नाही आणि त्यानंतर वाद सुरू झाला. या घटनेनंतर, रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया प्रभावकार अपूर्व मुखिजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लॅटेंटच्या आयोजकांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, इंडियाज गॉट टॅलेंट शोशी संबंधित प्रकरणात खार पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत ७ जणांचे जबाब नोंदवले आहेत. खार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पीआय संजीव धुमाळ यांनी माहिती देताना सांगितले की, रणवीर अलाहाबादिया देखील आज पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपला जबाब नोंदवू शकतो.
रणवीर अलाहाबादियाची माफी - रणवीर इलाहाबादिया यानं यापूर्वी जाहीरपणे माफी मागितली होती. त्यानं माफी मागताना कबूल केलं होतं की, त्याच्या कमेंट अयोग्य होत्या. "विनोद ही माझी खासियत नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात. मला ही जबाबदारी हलक्यात घेणारा माणूस व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मी कधीही अनादर करणार नाही. मला या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. या संपूर्ण अनुभवातून मी हेच शिकलो आहे.", असं तो व्हिडिओत म्हणाला होता.
हेही वाचा -