बीड : कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्येच 'रेशीम शेती' हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो.
नोकरी सोडून केली रेशीम शेती : बीड जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीडकडं पाहिलं जातं. मात्र, बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगावच्या एका कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवकानं नोकरी सोडत थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायची म्हटल्यावर कोणतं पिक घ्यावं हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असतो. ज्या पिकांमधून कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळेल अशी शेती केली पाहिजे. त्यामुळं रेशीम शेतीचा व्यवसाय निवडल्याचं कॅम्पुटर इंजिनियर असलेले मुकुंद राठोड यांनी सांगितलं.
रेशीम खरेदी केंद्रावर दिली भेट : "रेशीम शेतीसाठी अनेक ठिकाणी भेटी देत वेगवेगळी माहिती घेतली. लाॅकडाऊनच्या काळात नोकरी सुटल्यानंतर आता करायचं काय? हा मोठा प्रश्न होता. रेशीम शेती हा व्यवसाय निवडल्यावर अनेकांचे वेगवेगळे अनुभव ऐकले. त्याचबरोबर बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेशीम खरेदी केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी रेशीम शेतीची माहिती घेतली. कोणत्या रेशीम कोषाला जास्त मागणी आहे त्या रेशीमकिड्यांची पैदास केली. प्रतिवर्षी तीन ते चार लॉट घेऊन सहा ते सात लाख रुपये प्रति वर्षे उत्पादन घेतलं जातं". अशी माहिती मुकुंद राठोड यांनी दिली. त्याचबरोबर गावातील काही युवकांना रेशीम उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुकुंद राठोड मदत करत आहेत.
हेही वाचा -
- दुष्काळी बीड जिल्ह्यात रेशीम बाग जगवताना कशी करावी लागली कसरत? जाणून घ्या, शेतकऱ्यांच्या व्यथा... - Silk Farming In Beed
- Vashi Farmers : हौसेला मोल नाही, शेतकरीपण कमी नाही; रेशीम विक्रीसाठी पिकअपने गेले आणि विमानाने परतले
- Silk Farming Nashik : शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून साकारली आधुनिक 'रेशीम शेती'; वर्षाला मिळतोय भरघोष उत्पन्न