सातारा Shashikant Shinde : सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर मुंबई बाजार समितीतील काही तक्रारीवरुन तांत्रिक माहितीच्या आधारे नव्यानं गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती स्वतः शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात दिली. यावरुन शरद पवार साताऱ्यात आक्रमक झाले असून, दहिवडी इथं माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी यावरुन थेट सरकारला इशारा दिलाय.
राज्य सरकारला इशारा : या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, "शशिकांत शिंदे यांना निवडणुकीत अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात याविरोधात आवाज उठवून संघर्ष करतील." तसंच मुंबई मार्केट समितीतील तक्रारीवरुन शशिकांत शिंदेंना महायुतीतील भाजपाकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलाय. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात संयमानं, लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही, हे उदाहरण दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.