नवी दिल्ली- मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी (cm biren singh resignation) राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारीसंह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांनी यांनी एक्स मीडियात पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, " जवळजवळ दोन वर्षे मणिपूरमध्ये हिंसाचार, जीवितहानी झाली तरीही पंतप्रधान मोदींनी बिरेन सिंह यांना पुढे जाण्याची परवानगी दिली."
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं," जनतेचा वाढता दबाव, सर्वोच्च न्यायालयाची चौकशी आणि काँग्रेसचा अविश्वास ठराव यामुळे त्यांना (बिरेन सिंह) राजीनामा द्यावा लागला. सर्वात प्रथम मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि मणिपूरच्या लोकांच्या जखमा भरून काढणं, याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट दिली पाहिजे. तसेच लोकांचे म्हणणं ऐकलं पाहिजे. पूर्वीप्रमाणं परिस्थिती सुरळित करण्यासाठीची योजना स्पष्ट केली पाहिजे."
एकता प्रस्थापित व्हावी- मणिपूरमधील घडामोडींबद्दल काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत म्हणाले, "काँग्रेस पक्षानं मणिपूर विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मणिपूरमध्ये एक वर्षापूर्वीच राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी होती. अशांत मणिपूरसाठी एन. बिरेन सिंह यांचं सरकार जबाबदार आहे. अशांत मणिपूरसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा. तेथील कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये एकता प्रस्थापित व्हावी, अशी आमची मागणी आहे."
पक्षाच्या आमदारांमध्ये मतभेद नाहीत-एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावर मणिपूरच्या अध्यक्षा ए शारदा देवी म्हणाल्या, की, "आमच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी ५:३० वाजता राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी केंद्र सरकारला राज्याच्या अखंडतेच संरक्षण करण्याची आणि राज्यातील जनतेचे रक्षण करण्याची विनंतीही केली आहे. राज्याचे भविष्य लक्षात घेऊन राजीनामा दिला असून पक्षाच्या आमदारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत."
राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?- एन. राज्यपालांना लिहिलेल्या राजीनामापत्रात बिरेन सिंह यांनी लिहिलं की, "मणिपूरच्या लोकांची सेवा करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट राहिली आहे. मणिपूरच्या प्रत्येक नागरिकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे." राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एन. बिरेन सिंग हे मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल सिंह यांनी यापूर्वीच जनतेची माफी मागितली होती. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी १० फेब्रुवारीपासून सुरू होणारे मणिपूर विधानसभेचे अधिवेशन रद्द केलं.
दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये अशांतता- मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधी पक्षानं सातत्यानं भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे झालेल्या हिंसक संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हजारो लोकांना त्यांचे घर सोडावे लागलं. बिरेन सिंह यांना पदावरून हटविलं तरच भाजपाला पाठिंबा देऊ, असे एनपीपीचे प्रमुख आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी जाहीर केलं होतं.
हेही वाचा-