मुंबई Mumbai North East Lok Sabha : मुंबईतील ईशान्य लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, आता इथे महाविकास आघाडीतून शिवसेना (ठाकरे गटाचे) संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महायुतीतून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. जाणून घेऊया मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास.
किती मतदारसंघात आहेत? : सध्या मुंबई ईशान्य मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर यांचा समावेश आहे.
कसा आहे मुंबई ईशान्य लोकसभेचा इतिहास? : मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ 1967 मध्ये उदयास आला. 1967 साली काँग्रेसचे एसजी बर्वे हे या मतदारसंघातील पहिले खासदार म्हणून इतिहासात नोंद झालेली आहे. त्यांना यावेळी 1,71,902 मते मिळाली होती. परंतू विजयानंतर अगदीच अल्पकाळात बर्वे यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बर्वे यांच्या भगिनी तारा सप्रे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेल्या. तर काँग्रेसचे गुरुदास कामत चार वेळा सर्वाधिक खासदार राहिलेत. 1984 ते 2004 पर्यंत चार वेळा खासदार राहिले आहेत. तर मागील 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडणूक आले आहेत. दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा पराभव झाला आहे. 2014 साली किरिट सौमय्या हे खासदार होते तर 2019 साली मनोज कोटक यांना पाच लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली होती. 1984 पासूनचा विचार करता ईशान्य मुंबईवर काँग्रेस-भाजपा यांचा आलटून पालटून खासदार निवडून आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत येथे संजय दिना पाटील हे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा असा सामना रंगणार आहे.
काय आहेत समस्या? : मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर आणि भांडुप या विधानसभा मतदारसंघातील अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झालेले नाही आहे. येथील झोपडपट्ट्या रिडेव्हलपिंगच्या प्रतिक्षेत आहेत. भौगोलिकदृष्ट्या हा लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. मानखर्द शिवाजीनगरपासून ते मुलुंडपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. इथे मराठी, गुजराती, जैन, राजस्थानी, मुस्लिम आणि उत्तर भारतीय लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं इथे संमिश्र जाती आणि धर्मातील लोकं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. परंतु येथील अनेक समस्या आ वासून उभा आहेत. मुंबईच्या दिशेने येणारे स्थलांतर, वाढती लोकसंख्या याचाही सामना या मतदारसंघाला करावा लागत आहे. शहरीकरणाचा वाढता भार, प्रदुषण तसंच झोपडपट्ट्यांमधील पाणी, वीज या सुविधांची स्थिती सुधारलेली नाही. ठाण्याच्या दिशेनं आणि नवी मुंबईच्या दिशेने येणारे मुख्य रस्ते मुंबईत सर्वप्रथम या मतदारसंघात येतात. आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुविधांवर येणारा ताण या मुख्य समस्या मतदारसंघात आहेत.