नागपूर : गेल्या काही महिन्यांमध्ये एका प्रकारच्या गुन्ह्यांमुळं अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. हा गुन्हा म्हणजे 'डिजिटल अरेस्ट'. अनेकांना कोट्यवधी रुपयांनी सायबर भामट्यांनी फसवलं आहे. डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) जाळ्यात डॉक्टर, अभियंते, माजी पोलीस अधिकारी, माजी सैन्य दलातील अधिकारी देखील अडकले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बंगळुरूमध्ये एक प्रकरण उघडकीस आलं होतं. एका सॉफ्टवेअर अभियंत्याला महिनाभरात तब्बल ११.८ कोटी रुपयांनी गंडविलं होतं. पुण्यात एकाला सुमारे ६ कोटी रूपयांनी फसविल्याची घटना उघडकीस आली. अशा प्रकारच्या जाळ्यात अडकल्यानंतर एकही पैसा न गमाविता त्यातून बाहेर पडणं अशक्यच ठरतं. मात्र, एका व्यक्तिला मित्रांनी डिजिटल अरेस्ट झाल्यानंतर बाहेर काढलं, ही घटना नागपुरात घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली.
काय आहे प्रकरण? : व्यवसायानं वकील असलेल्या राजेश यांना (नाव बदललं आहे.) एक कॉल आला. पलिकडून बोलत असलेल्या भामट्यानं त्यांना आपण "ट्राय"चा अधिकारी बोलत असल्याचं सांगितलं. तुमच्या आधार कार्डचा वापर करून एक मोबाईल क्रमांक सक्रिय करण्यात आला आहे. त्यावरून अनेक महिलांना अश्लील संदेश पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय ड्रग्ज, मनी लाँड्रिंग, खंडणी इत्यादी गुन्ह्यांमध्ये त्या क्रमांकाचा वापर झाला आहे, असं त्यांनी राजेश यांना सांगितलं. राजेश यांना अनेक गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचं सांगत त्यांना बोलतं ठेवण्यात आलं. अनेक प्रकारे भीती दाखवण्यात आली. मात्र, त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना एक संधी मिळाली आणि त्यांनी मित्रांना कॉल केला. त्यामुळंच त्यांची सुटका झाली, अशी माहिती वकील राजेश यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आणि बँक अधिकाऱ्याच्या नावाचा वापर : राजेश यांना भीती दाखवण्यासाठी यापूर्वी अटक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तुमचाही सहभाग आहे, असं सांगून भीती दाखवण्यात आली. त्या नेत्याचं छायाचित्र ही दाखवलं. एका खासगी बँकेच्या माजी सीईओचाही असाच फोटो दाखवून भीती दाखविली. तुमच्या खात्यातून २५० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून ते देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात आले आहेत. तुमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून तत्काळ व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हा, असं राजेश यांना सांगण्यात आलं. त्यानंतर राजेश यांना व्हिडिओ कॉलवर सुमारे ३ तास समोर बसवून ठेवण्यात आल्याचं राजेश यांनी सांगितलं.
मित्रांच्या मदतीनं अशी झाली सुटका : भामट्यांनी राजेश यांना कॅमेऱ्यासमोरुन कोणत्याही परिस्थितीत उठून जाऊ नका, असं ठणकावून सांगितलं. साधारणत: ११ वाजताच्या सुमारास राजेश यांनी, मुलीला शाळेतून आणायचं आहे, असं सांगितलं आणि बाहेर आले. त्यांनी वकील मित्र मिथुन देशमुख यांना कॉल केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देशमुख यांनी मंगेश भावलकर, श्रीकांत गावंडे आणि नचिकेत व्यास या मित्रांसोबत थेट राजेश यांचं घर गाठलं आणि भामट्यांना उलट प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. एवढ्या लोकांना पाहुन भामट्यांनीही प्रतिप्रश्न केला. मात्र, मित्रांनी व्हिडिओ कॉल बंद केला. त्यानंतर राजेश यांना घेऊन सर्वजण सक्करदरा पोलीस ठाण्यात गेले. तेथे झालेल्या प्रकाराची तक्रार दिली. सक्करदरा पोलिसांनी तक्रार सायबर पोलिसांकडं वर्ग केली. राजेश यांनी भामट्यांना प्रत्यक्ष पैसे पाठविले नव्हते. त्यामुळं गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, मित्रांनी धाव घेतल्यामुळं त्यांची मोठी फसवणूक टळली असं मिथुन देशमुख म्हणाले.
संपूर्ण कुटुंब घाबरलं : सायबर भामट्यांनी राजेश यांना कारवाईबाबत धमक्या दिल्या. २५० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आकडा ऐकून त्यांची बोबडीच वळाली. तसेच भामट्यांनी त्यांना नोएडामध्ये एका डॉक्टरबाबत घडलेली घटना सांगितली. हा डॉक्टर डिजिटल अरेस्टमधून बाहेर पडला. पण, नंतर त्याचं अख्ख कुटुंबच संपवण्यात आलं. तुमचंही तसेच होईल, अशी धमकी दिली. त्यामुळं राजेश यांचं संपूर्ण कुटुंब घाबरलं होतं.
डिजिटल अरेस्ट म्हणजे आहे तरी काय : सायबर गुन्हेगारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये फसवणुकीसाठी ही पद्धत वापरण्यास सुरूवात केली आहे. सीबीआय, आयकर खाते किंवा इतर सरकारी यंत्रणेतील आपण अधिकारी असल्याचं सांगून तुम्ही फार गंभीर गुन्हा केल्याचं भासविण्यात येतं. पीडित व्यक्तीला खोलीत बंदीस्त राहण्यास सांगण्यात येतं. तसेच पोलिसांना न कळवण्याची धमकी दिली जाते.
तुमच्यासोबत असं घडलं तर काय कराल? : सर्वप्रथम एक लक्षात असू द्या की, कोणताही कायदा किंवा संहितेमध्ये डिजिटल अरेस्टची तरतूद नाही. तपास यंत्रणा ई-मेल किंवा व्हॉट्सॲपवर नोटीस तसेच समन्स बजावत नाहीत. भामट्यांनी कोणताही दावा केला तरीही एकदा स्वत:लाच विचारा की, तुम्ही असा प्रकार कधी केला आहे का? अशा परिस्थितीत भामट्यांनी केलेली पैशांची मागणी पूर्ण करू नका. हे पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच. घाबरू नका. सर्वप्रथम पोलिसांना कळवा. मित्रांची मदत घ्या, असं आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी केलं आहे.
हेही वाचा -