नागपूर Ramtek Lok Sabha : रामटेक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर आता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार आहेत. रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सूनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, आता श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेसचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा रामटेक लोकसभा मतदारसंघतील राजकीय समीकरण बदललंय.
काँग्रेससाठी कठीण? :लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनचं रामटेक लोकसभा मतदारसंघात रोज धक्कादायक उलटफेर बघायला मिळत आहेत. सर्वात आधी काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी पक्ष सोडल्यांनंतर आता रश्मी बर्वे यांचा अर्जही बाद ठरल्याने काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्कीच ओढवली. रश्मी बर्वे यांच्या ऐवजी आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. श्यामकुमार बर्वे हे ग्रामपंचायत स्तरावर राजकारण करत असल्यानं त्यांना रामटेकची किती जाण असेल या संदर्भात मतदारसंघात काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.
रामटेक,काँग्रेस व केदारांचं राजकारण : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेसचे गेम चेंजर नेते अशी ओळख असलेल्या सुनील केदार यांना रोजच धक्के बसत आहेत. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला पहिला धक्का बसला. संभाव्य संधी ओळखून राजू पारवे यांनी शिवसेनेचा धनुष्य हाती घेतलं. बक्षीस म्हणून शिवसेनेकडून त्यांना रामटेकच्या मैदानात उतरवण्यात आलंय.