मुंबई - बॉलिवूडच्या प्रतिष्ठित रोशन कुटुंबाच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष, आव्हानं, यश आणि संस्मरणीय क्षण दाखवणाऱ्या बहुप्रतिक्षित 'द रोशन्स' या माहितीपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. शशी रंजन दिग्दर्शित ही मालिका १७ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.
नागरथ झाले रोशन
तीन मिनिटांपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रेलरमध्ये, ऋतिक त्याच्या आडनावाचं रहस्य उलगडताना दिसतो. तो म्हणाला, 'आमचे आडनाव नागरथ वरून रोशन कसे बदलले ही एक अतिशय मनोरंजक कहाणी आहे. याबरोबरच, तो त्याच्या कमी बोलण्याच्या सवयीमुळे कसा गैरसमज झाला याचा किस्सा देखील कथन करतो.
उद्योगातील मित्रांनी गुपितं उलगडली
रोशन कुटुंबातील अनेक सह-कलाकार आणि मित्रांनी माहितीपटात अनेक गुपितं उघड केली आहेत आणि चित्रपट उद्योगातील त्यांच्या योगदानावरही प्रकाश टाकला आहे. यामध्ये आशा भोसले, शाहरुख खान, अनिल कपूर, सोनू निगम, अनु कपूर, सलीम मर्चंट, प्रियांका चोप्रा आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या सेलिब्रिटींनी द रोशनच्या माहितीपटात रोशन कुटुंबाबद्दल आपले विचार व्यक्त केलं आहेत. या दिग्गज कालाकरांनी त्यांच्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी उघड केल्या आहेत. हृतिकची कोई मिल गया मधील सह-अभिनेत्री आणि जवळची मैत्रीण प्रीती झिंटा म्हणाली की, "प्लिज, मला आता त्याच्या गुपित्यांबद्दल विचारू नका."
'द रोशन्स'चा ट्रेलर कसा आहे?
ट्रेलरमध्ये रोशन कुटुंबाचं प्रचंड यश तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या अपार कष्ट आणि संघर्षांचे चित्रण करण्यात आलं आहे. दिवंगत संगीतकार रोशन लाल नागरथ, त्यांचे पुत्र - चित्रपट निर्माते राकेश रोशन आणि संगीतकार राजेश रोशन आणि त्यांचा नातू, प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन यांच्या चित्रपट उद्योगातील प्रवासावर प्रकाश टाकणारा हा माहितीपट त्यांचा गौरवशाली वारसा देखील जपताना दिसतो.
या मालिकेच्या दिग्दर्शनाबद्दल बोलताना शशी रंजन म्हणाले, 'या माहितीपट-मालिकेचे दिग्दर्शन करणं हा एक वेगळा आणि सुंदर अनुभव होता. मला ते करण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे. रोशन कुटुंबाची सर्जनशीलता, धाडस आणि कामगिरीची कहाणी जगासमोर आणणं हा एक सन्मान आहे आणि या महान चित्रपट कुटुंबाचं नेटफ्लिक्सवर प्रवाह करणं हा एक अभिमानाचा क्षण आहे. 'द रोशन्स' या माहितीपटात आधी, प्राइम व्हिडिओच्या 'द अँग्री मॅन'ने दिग्गज पटकथा लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला होता. नेटफ्लिक्सच्या द रोमँटिक्सने यश चोप्रा यांच्या यशराज फिल्म्स आणि बॉलिवूडमधील योगदानाला सलाम केला आहे. रोशन कुटुंबावरील हा माहितीपट प्रेक्षकांना आणखी एका संस्मरणीय प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 'द रोशन्स' १७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.