मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत. अशातच सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. महापालिकेवर मागील जवळपास 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयानंतर भाजपाने महापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याची तयारी सुरू केलीय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतदेखील फूट पडण्याची चिन्हं आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर 'दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातदेखील घडू शकतं,' असं म्हणत बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सूतोवाच खासदार संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडीच्या चर्चा रंगल्या आहेत.
काँग्रेस देशात मोठा पक्ष : यासंदर्भात माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस मोठा पक्ष आहे हे आम्हीदेखील वेळोवेळी सांगितलेलं आहे. काँग्रेस देशात मोठा पक्ष असला तरी दिल्लीत आम आदमी पक्ष मोठा आहे. निवडणुका लढताना आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यासाठी कार्यकर्त्यांचा विशेष दबाव असतो. मागील काही वर्षांतील दिल्लीतील विधानसभा निवडणुका असोत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत तिकडे आपची ताकद दिसते. त्यामुळे दिल्ली निवडणूक आप जिंकेल."
इंडिया आघाडीतही आजही आम्ही सोबत : राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस आमच्यासोबत आहे. इंडिया आघाडीतही आजही आम्ही सोबत आहोत. दोघेही आप आणि काँग्रेस दोनही आमचे मित्र पक्ष आहेत. दोघांनी एकत्र लढले पाहिजे. आमचा शत्रू भाजप आहे, काँग्रेस आणि आप नाही. मुळात आमची इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी अस्तित्वात आली. या आघाडीला तुम्ही सर्व निवडणुकांशी जोडू शकत नाही. आज जे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आप आणि काँग्रेस मध्ये घडताना दिसतय तेच उद्या मुंबई महानगरपालिकेच्या नवडणुकीत घडताना दिसू शकत. कारण लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे महत्त्वाचे असतं."
स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची भूमिका : यावर आम्ही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितलं की, "स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची भूमिका अनेकदा झालेली आहे. प्रत्येक पक्षाची स्वतःची गरज असते. त्यामुळे कोण कुणावर उपकार करण्यासाठी राहात नसतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपापला निर्णय घ्यावा. आम्हीदेखील स्वबळाच्या तयारीत आहोत." दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच शिवसेना आणि काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याने पुन्हा एकदा आघाडीत बिघाडीच्या चर्चा सुरू झाल्यात.
हेही वाचा -