पुणे : नेहमी म्हटलं जातं की, पुण्यात जे पिकतं ते सगळीकडं विकलं जातं. सध्या पुण्यात एका वेगळ्या आईस्क्रीमची (Ice Cream) चर्चा सुरू आहे. ते म्हणजे ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून (Millet Ice Cream) बनवण्यात आलेलं आईस्क्रीम. थंडीच्या दिवसातही हे आईसस्क्रीम खाण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
मिलेट महोत्सवाचं आयोजन : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं 'मिलेट महोत्सवाचं' आयोजन करण्यात आलं आहे. यात मिलेटपासून (तृणधान्य) बनवलेल्या पदार्थांचे विविध प्रकारचे 50 स्टॉल लावण्यात आले आहेत. या महोत्सवात एपीएल चीझ अँड क्रीम प्रायव्हेट लिमिटेडकडून देखील मिलेट आईस्क्रीमचा स्टॉल लावण्यात आला आहे. जगातील पाहिलं ज्वारी, बाजरी आणि नाचणीपासून बनविण्यात आलेलं आईस्क्रीम येथे उपलब्ध आहे.
"आम्ही भरड धान्यापासून जगातील पहिलं आईस्क्रीम बाजारात आणलं आहे. याची चव ही अप्रतिम आहे. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकांना बाजारभाव मिळावा यासाठी आम्ही अभ्यास करत होतो. आधुनिक पद्धतीनं याचा विचार करत असताना, आमच्या टीमनं तामिळनाडू येथील त्रिचीमध्ये 'सिरी' या आईस्क्रीमचं संशोधन केलं. आम्ही १६ ते २२ प्रकारात हे आईस्क्रीम बाजारात आणलं आहे. यामध्ये शून्य कॉलेस्ट्रॉल, ग्लूटेन मुक्त, अंडी विरीहित, दुग्धजन्य पदार्थ मुक्त, तसंच कृत्रिम रंग विरहित आणि नैसर्गिक चव असलेलं हे आईस्क्रीम आहे". - नितीन दिवटे
बाजारात रॅफल्स, पिझ्झा, मिलेट शेक आणणार : "काहीतरी वेगळं केलं पाहिजे या विचारातून ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या आईस्क्रीमचा शोध लावला. जेव्हा आम्हाला आईस्क्रीम बाजारात आणायचं होतं तेव्हा अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभे होते. जसं की कसं कॉम्बिनेशन करता येईल, कोणकोणते फ्लेवर बाजारात आणू शकतो, ग्राहकांना काय दिलं पाहिजे? याचा संपूर्ण अभ्यास करून हे आईस्क्रीम बाजारात आणलं आहे. तसंच आता या मिलेट आईस्क्रीमला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे ते पाहता आता आम्ही बाजारात रॅफल्स, पिझ्झा, मिलेट शेक हे देखील आणणार आहोत", अशी माहिती नितीन दिवटे यांनी दिली.
या चार राज्यात विकली जात आहेत आईस्क्रीम : नितीन दिवटे पुढे म्हणाले, "आम्ही 16 ते 20 फ्लेवरमध्ये आईस्क्रीम बनवलं असून यात मॅंगो, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, जामुन, चॉकलेट, फिल्टर कॉफी अशा विविध प्रकारच्या फ्लेवरचा समावेश आहे. तसंच हे आईस्क्रीम आम्ही तमिळनाडू येथील त्रिची येथे बनवत आहोत. तर हे आईस्क्रीम तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा चार राज्यात विकलं जात आहे. याला ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे".
मंत्री महोदयांनी देखील केलं कौतुक : मिलेट महोत्सवाचं उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी रावल यांनी देखील या आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. ते म्हणाले, "आज मी पुण्यातील मिलेट महोत्सवाला भेट दिली. यावेळी मिलेटपासून बनविण्यात आलेले अनेक पदार्थ पाहिले. पण सर्वात आश्चर्य करणारा आणि खूप आकर्षित करणारा पदार्थ म्हणजे मिलेटपासून बनविण्यात आलेलं आईस्क्रीम आहे. हे आईस्क्रीम खाल्ल्यावर कुठल्याही आईस्क्रीमला मागे टाकेल असं अत्यंत हेल्दी आईस्क्रीम असून पुढच्या वेळेस देखील मी नक्की आईस्क्रीम खाणार आहे."
खूपच चविष्ट असल्याचं ग्राहकांचं म्हणणं : आजपर्यंत आम्ही अनेक आईस्क्रीम खाल्ली आहेत. पण असं आईस्क्रीम पहिल्यांदाच खाल्लं असून यांची चव खूपच मस्त आहे. नॉर्मल आईस्क्रीम आणि मिलेट आईस्क्रीममध्ये खूपच फरक असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
हेही वाचा -