पुणे Raj Thackeray Pune Sabha : दोन चार दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम समाजाच्या मौलवी यांनी फतवा काढत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. हीच बाब समोर ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फतवा काढलाय. "जर मुस्लिम समाजातील मौलवी फतवा काढत असतील तर मी देखील माझ्या हिंदू समजातील लोकांना फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा, अस यावेळी राज ठाकरे म्हणाले.
पुण्यात झाली सभा :पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना फतवा काढला. पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात मुख्य लढत होत आहे.
राज ठाकरेंनी काढला फतवा : "देशात अनेक चांगले मुस्लिम लोकं आहे. पण, ज्यांना दहा वर्षात डोकं वर काढायला मिळालं नाही ते आज फतवे काढत आहेत. मी देखील फतवा काढतो की, महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा," असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि मुस्लिम समाजात्ली 'त्या' मौलवींवर जोरदार टीका केली. "विवादित मशीद पडल्यानंतर वाटलं नव्हतं की तिथं राम मंदिर होईल, पण आज जे राम मंदिर झालं आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं झालं," असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.