मुंबई: राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाचे कुलाबा मतदारसंघातील आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे, असं झाल्यास ते रविवारी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील.
2022 मध्ये पहिल्यांदाच सांभाळली अध्यक्षपदाची धुरा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी अध्यक्षपदी काम केलं. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडं अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार २०२२ मध्ये सत्तेवर आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड झाली होती.
सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा : कोळंबकर यांनी विधानसभेवर निवड झालेल्या राज्यातील नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मुनगंटीवार यांनी ही चर्चा कुणी सुरू केली त्याचं नाव सांगा, माझं नाव या चर्चेत नाही अशी सारवासारव केली. रविवारी दुपारपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची मुदत असून आपण रविवारी मुंबईत नसल्याची माहिती त्यांनी दिली.