सातारा- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या हत्या प्रकरणातील संशयिताच्या 'कराड' आडनावामुळं साताऱ्यातील यशवंतप्रेमी अस्वस्थ झालेत. आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांची कर्मभूमी बदनाम होत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केलीय. आरोपी वाल्मिक कराडचा आणि यशवंतरावांच्या कर्मभूमीचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे कराडला बदनाम करू नका, असं आवाहन कराडमधील यशवंतप्रेमींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नेटकऱ्यांना केलंय.
यशवंतरावांचं 'कराड' सुसंस्कृत : मस्साजोग सरपंचाच्या हत्येनंतर कराड हे नाव प्रसार माध्यमं, सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. तेव्हापासून कराड शहर आणि तालुक्यात 'कराड' नावावर एक वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. नेटकऱ्यांमध्येसुद्धा वाल्मिक कराड हे एकच नाव चर्चेत आहे. परंतु वाल्मिक कराड हा त्या घटनेतील एक संशयित आरोपी आहे. त्या कराडचा आणि आपल्या कराड शहराचा काहीही संबंध नाही. आपलं 'कराड' हे सुसंस्कृत आहे. आरोपीच्या आडनावामुळं यशवंतरावांचं कराड बदनाम होऊ नये, याची काळजी नेटकऱ्यांनी घ्यावी, असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटलांनी केलं.
आमचं कराड हिमालयाच्या मदतीला धावलेलं : देशाच्या संरक्षणासाठी हिमालयाच्या मदतीला धावून गेलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचं हे कराड आहे. राजकीय संस्कृती कशी असावी, राजकारणात कसं काम करावं, याचं उदाहरण त्यांनी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसमोर ठेवलंय. त्यांचं कराड हे वाल्मिक कराडच्या नादात बदनाम होऊ नये, याची काळजी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांनी घ्यावी, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. दीपक थोरात यांनी केलंय.
असं आहे आमचं कराड : कराड ही यशवंतराव चव्हाण आणि संतांची भूमी आहे. कराडच्या खाशाबा जाधवांनी देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. स्वच्छ, सुंदर शहरांमध्ये कराडने देशात पहिला क्रमांक पटकावला. दारूबंदीचा पहिला ठराव करणारं ओंड हे गाव कराड तालुक्यातीलच आहे. असं असताना कराडचा संबंध वाल्मिक कराडच्या आडनावाशी जोडून सोशल मीडियावर विनोद निर्माण करणं खेदजनक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर यांनी व्यक्त केलंय.
जळगावच्या समाज जीवनाला बसला होता फटका : एखाद्या गावाचा बदलौकिक झाला की काय होतं, त्याचा अनुभव जळगावकरांनी घेतला होता. एकेकाळी राज्यात गाजलेल्या वासनाकांडामुळं जळगावच्या समाज जीवनाला मोठा फटका बसला होता, अशी आठवणही प्रमोद तोडकर यांनी सांगितली. सध्या बीडच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या आडनावाचा यशवंतरावांची कर्मभूमी असणाऱ्या कराडशी संबंध जोडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. यशवंतरावांचं कराड आणि वाल्मिक कराड यात जमीन आस्मानाचा फरक आहे. त्यामुळं यशवंतरावांच्या कर्मभूमीची बदनामी होऊ नये, याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी नेटकऱ्यांना केलं.
हेही वाचा :