मुंबई Pravin Darekar :भाजपा गटनेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाचा चुकीचा वापर करून खोटा व्हिडीओ 'मराठी एक्सप्रेस या युट्युब चॅनेल'ने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या फेक व्हिडीओचा आधार घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दरेकर यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. जरांगेंद्वारे युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कसं फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं. याबाबत दरेकर यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली आहे. तसेच संबंधीत युट्युब चॅनेलविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही दरेकर यांनी केलीय.
प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर (ETV BHARAT Reporter) युट्युब चॅनेलवर गुन्हा दाखल करावा :मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, 'मराठी एक्सप्रेस' नावाचे युट्युब चॅनेल आहे. ज्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मी केलेलं विधान ज्या पद्धतीनं ट्विट केलं आणि ज्यावर जरांगेंनी २८ तारखेला मुंबईतील एका आमदाराला पळवून लावले असा शिक्कामोर्तब केला होता. आज त्या फेक नॅरेटिव्हचा पर्दाफाश मी पोलीस आयुक्तांना भेटून केलाय.
फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे :३० जून रोजी समता नगरला महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता. मी वक्तव्य केलं १७ जुलैला आणि ३० जूनचा फोटो वापरून दरेकरांची मराठा आरक्षणावर संताप व्यक्त करून हकालपट्टी केली अशा प्रकारची खोटी बातमी या मराठी एक्सप्रेस युट्युब चॅनेलने, संपादकांनी, पत्रकारांनी केली. २८ जुलैला जरांगे यांनी त्याचा पुनःरूच्चार करत मुंबईतून आमदाराला हकालले गेल्याचं म्हटलं. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून आम्ही काहीही करू शकतो, समाजाची दिशाभूल करू शकतो असा जो समज होता तो आज पुराव्यासहित पोलीस आयुक्तांना दिल्याचं दरेकर यांनी सांगितलं.
फडणवीसांना टार्गेट करण्याचं कारण काय? :दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षणात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, आम्ही तो हाणून पाडला. आम्ही मराठा समाज, आंदोलकांच्या बाजूने आहोत. परंतु आपले आंदोलन राजकारणासाठी वापरले जाऊ नये एवढीच आमची माफक अपेक्षा होती. फडणवीसांना टार्गेट करण्याचं कारण काय? त्यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं आणि कोर्टात टिकवलं. परंतु, सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं. उद्धव ठाकरेंना ते टिकवता आलं नाही. त्यांना कोणी विचारत नाही. शरद पवार चार-चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार होते. त्यांना कुणी विचारत नाही. केवळ फडणवीसच या गोष्टीचे कर्तेधर्ते आहेत अशा प्रकारचे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडला.
हेही वाचा -
- दरेकर जरांगेंचा कलगी तुरा; जरांगे म्हणतात, 'कपाळावर कुंकू लावले तर ते...', तर दरेकर म्हणतात 'जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही' - Manoj Jarange Patil
- महायुतीत मिठाचा खडा, "अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावा", चंद्रकांत पाटलांवरील 'त्या' टीकेवरुन प्रवीण दरेकर संतापले - Pune FC Road Drug Case
- "संजय राऊतांना अटक करा"; प्रवीण दरेकरांनी का केली मागणी? - Pravin Darekar on Sanjay Raut