माळेगाव (नांदेड) : जसजशा वेगवेगळ्या क्रांती होत गेल्या तसतशी काही गोष्टींना किंमत येत गेली तर काही गोष्टींची किंमत कमी होताना आपण पाहात आहोत. पूर्वी शेती करायला मनुष्यबळाची गरज होती. मात्र शेतीचं यांत्रिकीकरण झालं आणि माणसांची किंमत शेतीकामात राहिली नाही. उद्योग धंदे आले तशी पारंपरिक शेतीलाही किंमत राहिली नाही. संगणकाच्या युगात दहा माणसांचं काम एक माणूस करायला लागला. त्यामुळे मनुष्यबळ कमी लागायला लागलं. सध्या मेहनतीची कामं करणाऱ्या जनावरांच्यावरही अशी वेळ आली आहे. माळेगावच्या यात्रेत ही परिस्थिती बघायला मिळाली. ओझी वाहून नेणाऱ्या वाहनांची सध्या चलती आहे. त्यामुळे अशा कामासाठी लागणाऱ्या गाढवांची किंमत खूपच कमी झाल्याचं बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या बाजारामध्ये मोटर सायकलची किंमत एक लाख वीस हजार ते दीड लाखापर्यंत आहे. पण माळेगावमध्ये गाढवांच्या दरात प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. 25 हजारापासून ते साठ हजार रुपयापर्यंत गाढवांच्या किंमती (Donkey And Camel) झाल्या आहेत. त्यामुळं गाढव व्यापारी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गाढवांच्या विक्रीचा कसा होतो व्यापार : जेजुरीनंतर माळेगावतील यात्रेत सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो. या यात्रेत गाढवांचा बाजार भरवण्याची परंपरा ही मागील 400 ते 500 वर्षापासून आहे. येथील यात्रेत गाढवांचा व्यवहार हा कॅशलेस पद्धतीनं केला जातो. यावर्षी गाढव घ्या आणि पुढच्या वर्षी पैसे द्या अशी प्रथा व्यापारी आणि ग्राहकांमध्ये आहे. गाढवाचे व्यापारी हा व्यवसाय अनेक वर्षापासून करत आहेत. कुठलाही लिखित व्यवहार न करता गाढवांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केवळ देवाच्या भरोशावरच केला जातो. श्रीक्षेत्र खंडोबाच्या नावावर चांगभलं म्हणत हा व्यवहार केला जातो. यंदा गाढवांच्या किंमतीत प्रचंड घसरण झाल्याचं व्यापारी सांगतात.
गाढवाची जागा गाडीने घेतली : गाढव खरेदी करून वाहतूक, वाळू उपसा अशी अनेक कामे केली जात होती. इतर कामासाठी गाढवांचा उपयोग केला जातो. तसंच गाढविणीच्या दुधाला तब्बल दहा हजार रुपये लिटरने मागणी आहे. केवळ एक चमचा दुधाची किंमत ही 200 ते 300 रुपये आहे. असं असलं तरी हा व्यवसाय सगळीकडेच चालतो असं नाही. दुसरीकडे सध्या वाळू उपसा जेसीबीच्या साह्याने सुरू आहे. तसंच वाळूची ट्रक आणि ट्रॅक्टरच्या मदतीने वाहतूक केली जात आहे. त्यामुळं गाढवांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.
उंट व्यापारी आर्थिक अडचणीत : माळेगाव यात्रेत काठेवाडी, जैसलमेरी, नुकरा जातीचे उंट आले आहेत. उंटांचा उपयोग हा लग्न समारंभात, शोभायात्रेत देखावा, संदल आणि लहान मुलांना उंटावर बसून फेरी मारण्यासाठी केला जातो. लहान मुलांना फेरी मारून उंट व्यापारी दिवसाला पाचशे ते हजार रुपये कमवतात. पण हा व्यवसाय करण्यासाठी नवीन व्यवसायिक समोर येत नाहीत. टांगा मागणीत देखील घट झाली आहे. तर आधुनिकीकरण आणि इतर करमणुकीच्या व्यवसायाकडं व्यावसायिक वळल्याची माहिती उंट व्यापारी सय्यद हाफिस यांनी दिली.
हेही वाचा -