पुणे : महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. यावरुनच कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे? : राज्याचे कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांच्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "पक्षानं छगन भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवलाय. अजून किती लाड करायचे?", असा टोला त्यांनी भुजबळ यांना लगावला. "माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी कोणी नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
चौकशी सुरू : भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न राबविण्यात आल्याचं सांगितलंय. याबाबत कोकाटे यांना विचारलं असता ते म्हणाले, "यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उत्तर दिलंय. त्यांनी त्यांच्या पातळीवर चौकशी सुरू केलीय. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते अहवाल सादर करतील. अद्याप कुठलाही अहवाल आलेला नाही. तसंच ज्यांनी-ज्यांनी गैरप्रकार केलेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."
- एका वेळेस दोन योजनेंचा लाभ नाही : पंतप्रधान किसान योजना आणि लाडकी बहीण योजनेचा महिलांना एकत्रित लाभ मिळणार नाही. याविषयी कोकाटे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "एका वेळेस दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं लाडकी बहीण योजना पाहिजे की पंतप्रधान योजना पाहिजे? याबाबत महिलांनी निर्णय घ्यावा."
हेही वाचा -
- छगन भुजबळांबद्दल दोन तीन दिवसांत निर्णय; राऊत, सुळेंकडून आमच्या सरकारवर कौतुकाचा ओघ कायम राहावा - सुनील तटकरे
- मला जो निर्णय घ्यायचा तो मी घेतला आहे, योग्य वेळ आली की सांगेन; मंत्रिपदाबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
- छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत अजित पवार म्हणाले, "आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय, तो आमचा आम्ही सोडवू"