बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी कारनामा केला. वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस, म्हणत तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना धारुरच्या तरनळी येथे घडली आहे. अशोक शंकर मोहिते असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा मित्र सिद्धेश्वर सानप आणि वैद्यनाथ बांगर यांनी अशोक मोहिते या तरुणाला बुधवारी बेदम मारहाण केली. फरार असलेला कृष्णा आंधळेचा बुधवारी वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाचं स्टेटस आंधळेच्या मित्रांनी ठेवलं होतं. मात्र, अशोक मोहिते हा तरुण वाल्मीक कराडच्या बातम्या मोबाईलवर पाहत असल्यानं आंधळेच्या मित्राला संताप आला. त्यांनी मोहितेला काठीनं बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार धारुर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाण करणारे हे दोन्ही तरुण कृष्ण आंधळेचे समर्थक आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक मोहिते याच्यावर उपजिल्हा रुग्णालय अंबेजोगाई येथे उपचार सुरू आहेत. आंधळेच्या दोन्ही मित्रांवर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला अटक करण्याचं पोलिसांसमोर आव्हान- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. मात्र, ५८ दिवसांहून अधिक दिवस झाले तरी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आरोपीला शोधण्याचं स्थानिक गुन्हे शाखा, एसआयटी आणि सीआयडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आष्टी येथील उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथून पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा बुधवारी इशारा दिला. तर तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करा, अशी मुख्यमंत्र्यांकडं मागणी केली. त्याचदिवशी फरार आरोपीच्या मित्रांकडून तरुणाला मारहाण झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा-