पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्य नव्हे तर देशभर बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण गाजत आहे. देशमुख यांच्यासह परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी (somnath suryavanshi) यांच्या न्यायासाठी राज्यभर आंदोलने उभारली जात आहेत. अशातच रविवारी (५ जानेवारी) देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी पुण्यात मोर्चा निघाला आहे. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी, संताप व्यक्त केला.
सकल मराठा समाजाकडून मोर्चा : सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसंच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. तसंच विविध पक्षाचे राजकीय नेते, मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? : “धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री आवरा यांना नाहीतर आम्ही थांबणार नाही. धनंजय मुंडे आमचे लोक तुला अडकवतील. ज्या मराठ्यांनी तुला वाचवलं, त्यावर तू पलटला. प्रति मोर्चे काढले तर आम्ही देखील तसंच उत्तर देऊ. आम्ही देखील मोर्चाने उत्तर देवू. क्रूर हत्या केली. यांना नक्की राज्य कुठं न्यायचं आहे. राज्यभरात मराठा मोर्चे काढू, हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, अजून बोललो नाही. तुमच्या सरकारमध्ये राहून याला जातीय तेढ निर्माण करायची आहे”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
नाही तर असा संदेश जाईल : वाल्मीक कराडला खूनात आरोपी करावंच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना हे करावं लागणार आहे. त्यांना दाखवावं लागेल की मी मंत्र्याच्या पाठीशी नाही. तसंच यातील एकही आरोपी सुटला तसंच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. तसंच सध्या तरी सरकारवर कोणाचाही दबाव आहे असं वाटत नाही. पण ज्या दिवशी आरोपी सुटला असं आढळलं तर, तेव्हा मराठ्यांची फसवणूक झाली आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना उघळ्यावर सोडून देण्यात आलं असं म्हणावं लागेल, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा -