मुंबई : देशातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे लवकरच अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. दररोज 11.5 लाखांहून अधिक प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करतात. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. मध्य रेल्वेनं 7 बॅगेज स्कॅनर आणि 142 बॉडी स्कॅनर यासाठी निविदा जारी केली आहे. पुढील 18 महिन्यांत या मशीन्स कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिलीय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून प्रतिदिन 10 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तर, लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी महत्त्वाचं असं टर्मिनल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडं पाहिलं जातं. या रेल्वे स्थानकामधील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून उपनगरीय आणि मेल एक्सप्रेसच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.
32 प्रकारच्या धोकादायक वस्तू ओळखण्यास सक्षम : मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची सुरक्षा आणखी भक्कम करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 बॅगेज स्कॅनर आणि 142 बॉडी स्कॅनर यासाठी निविदा जारी केले आहेत. त्यासाठी पुढील 18 महिन्यांत या मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, नव्या हायटेक लगेज स्कॅनिंग मशीन 32 प्रकारच्या धोकादायक वस्तू ओळखण्यास सक्षम असणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणारे हजारो प्रवासी मोठ्या प्रमाणात सामान घेऊन जातात. या सामानात स्फोटकं, शस्त्रास्त्रं आणि इतर धोकादायक पदार्थ असण्याची शक्यता असल्यानं सुरक्षेसाठी या मशीन महत्त्वाच्या ठरणार आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर 102 हून अधिक प्रवेशद्वार असल्यानं प्रवाशांच्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक आहे. मात्र, या हायटेक स्कॅनिंग मशीनच्या मदतीनं प्रत्येक प्रवासी आणि त्यांच्या सामानावर काटेकोर नजर ठेवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून दररोज अप आणि डाऊन मार्गावर तब्बल 120 मेल एक्सप्रेस धावतात. तर तब्बल 1 हजार 810 लोकल फेऱ्या अप आणि डाऊन मार्गावर चालतात. त्यामुळं येत्या काळात या नवीन स्कॅनिंग मशीनमुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
हेही वाचा -