पालघर : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान भावविवश झालेल्या शिक्षकाचा राष्ट्रगीत सुरू असताना व्यासपीठावर कोसळून मृत्यू झाला. संजय लोहार असं या शिक्षकाचं नाव आहे. त्यांच्या निधनामुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालय आहे. या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी दहावीचे विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत आले होते. शिक्षकांनी घालून दिलेले धडे आयुष्यात प्रत्यक्षात आणायचे असे स्वप्न घेऊन मुले-मुली आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
आनंदोत्सवाचे शोकसभेत रुपांतर : संजय लोहार यांच्यासह अन्य शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात काय काय वाटा आहेत? कोणत्या शैक्षणिक वाटेवर गेल्यानं यशस्वी होता येईल, याचं मार्गदर्शन करत होते. विद्यार्थीही आपल्या जीवनाचं स्वप्न रंगवत होते. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणं झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
संजय लोहार हे अतिशय प्रेमळ, संवेदनशील आणि सामाजिक उपक्रमात आघाडीवर असणारे शिक्षक होते. खडतर परिस्थितीवर मात करून ते पुढं आल्याने त्यांना परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळं ते इतरांच्या मदतीला धावून येत. सर्व सहकाऱ्यांशी ते आदरानं वागायचे.-प्रसाद चंपानेरकर, शिक्षक, लालबहादूर शास्त्री विद्यालय, मनोर
अखेरचा हुंदका : विद्यार्थ्यांना निरोप देताना लोहार यांना गहिवरून आलं होतं. दाटून आलेला तो त्यांचा हुंदका त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण हळवे झाले होते. परंतु काही क्षणातच त्यांचा मृत्यू होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. लोहार हे मूळचे विक्रमगडच आहेत. डी. एड. झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. शाळेत शिकवत असताना ते दुसरीकडं स्वतःही शिकत होते. शिक्षणाची एकेक पायरी पार चढून त्यांनी बी. एड केलं. इतिहास आणि अन्य विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं. अतिशय संवेदनशील, समाजसेवी वृतीचे आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारे लोहार हे विद्यार्थी आणि शिक्षकांतही लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्यानं लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सर्वांना धक्का बसलाय.
हेही वाचा -