शिर्डी : साई बाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साई बाबा संस्थाननं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोफत प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांना प्रसादाचं टोकन दिलं जात आहे. टोकन असणाऱ्या भाविकांनाच साई बाबा संस्थानच्या मोफत प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. संस्थानच्या या निर्णयाचं भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.
साईबाबा संस्थानाचा मोठा निर्णय : शिर्डीत साई बाबा संस्थानच्या वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं. या ठिकाणी दिवसाकाठी सरासरी पन्नास हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. मात्र, त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती, अमलीपदार्थांचं सेवन केलेल्या काही व्यक्ती प्रसादाचा लाभ घेतात. तसंच ते इतर भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्यानं आता संस्थाननं भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना जिथं उदी-बुंदी प्रसादा दिला जातो. तिथंच प्रसादालयातील मोफत भोजनाचं टोकन देण्याची व्यवस्था केल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
भाविकांना मोठा दिलासा : साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक साईबाबांचा प्रसाद घेण्यासाठी प्रसादालयात जातात. त्यावेळी त्यांना तिथंच मोफत प्रसादाचं तिकीट दिलं जात होतं. यावेळी गुन्हेगारी प्रवृत्ती, अमलीपदार्थांचं सेवन करणाऱ्या काही व्यक्ती तिथूनच तिकिट घेऊन प्रसाद घेण्यासाठी जात होते. या लोकांमुळं भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं संस्थानच्या वतीनं सांगण्यात आलं. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आजपासून नव्या नियमाची अंमलबजावणी : भाविकांना याआधी प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभं राहून मोफत प्रसादाचं टोकन घ्यावं लागत होतं. मात्र, आता थेट भाविक दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतरच टोकन मिळतं असल्यानं भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळं संस्थानच्या या निर्णयाचं भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे.
हेही वाचा :