अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीत 1400 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी तहसीलदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली. यासह त्यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात आज (दि.६ फेब्रुवारी) तक्रार दिली. "या प्रकरणात अमरावतीचे जिल्हाधिकारी देखील दोषी आहेत" असं किरीट सोमैया यांनी म्हटलं.
असं आहे प्रकरण : लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता असताना महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी झाली. या रोहिंग्या मुस्लिमांना महाराष्ट्रातील जन्माचे दाखले मिळाले. मालेगाव, भिवंडी, अमरावती, अकोला या जिल्ह्यात हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. विशेष म्हणजे 13 जानेवारीला किरीट सोमैया हे स्वतः अंजनगाव सुर्जी इथं आले असता त्यांनी बांगलादेशी रोहिंग्यांना अवैधरित्या जन्म प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी तहसीलदारांना प्रश्न विचारले होते.
प्रशासनावर ओढले ताशेरे : अंजनगाव सुर्जी तहसीलदारांची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर किरीट सोमैया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात ताशेरे ओढलेत. "अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात जन्म प्रमाणपत्रासाठी 1484 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एकाही अर्जाची तपासणी न करता 585 जणांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं. तसंच एकूण 900 अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली. बांगलादेशमधून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांनी जन्म प्रमाणपत्र दिल्यासंदर्भात शंभर पुरावे दिले असताना देखील तहसीलदारांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही. यामुळं तहसीलदारांवर गुन्हा दाखल व्हावा. तसंच या प्रकरणात तहसीलदारांसोबतच तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारी, अंजनगाव सुर्जी इथले काही वकील दोषी आहेत" असं किरीट सोमैया म्हणाले.
या प्रकरणात जिल्हाधिकारीही दोषी : "या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे आदेश शासनानं दिले असताना देखील त्यांनी कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही. तहसीलदारांना काय आदेश द्यावेत? ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी केवळ गोड बोलतात, मात्र काम शून्य आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी देखील दोषी असून त्यांची चौकशी व्हायला हवी, त्यांच्यावर देखील कारवाई करावी." असं किरीट सोमैया म्हणाले.
विदर्भात तीन जिल्ह्यात घोटाळा : "विदर्भात अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही जिल्ह्याचं फॉरेन्सिक ऑडिट करावं." अशी मागणी देखील किरीट सोमैया यांनी केली.
हेही वाचा :