गडचिरोली : छत्तीसगडमधील बीजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. ही घटना ताजी असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार इथल्या जंगलात नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलविण्यात आलं आहे.
विश्वासार्ह माहितीच्या आधारे केली कारवाई : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात छत्तीसगढ सीमेवर दिरंगी आणि फुलनार गावांमध्ये नक्षलवाद्यांनी तळ उभारल्याची विश्वासार्ह माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (दि.१०) अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस.रमेश आणि श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात सी-६०चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटीचे २ पथक पाठवले होते. सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी केली.
कारवाई करत पोलिसांनी केला नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त : घेराबंदी केल्यानंतर दिवसभरात नक्षलवादी आणि पोलीस पथकांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी पोलिसांनी कारवाई करत नक्षलींचा तळ उद्ध्वस्त केला. यासह नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत. सदर कारवाईदरम्यान सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला. सदर जवानाला तातडीनं वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरनं नागपूर इथं हलवण्यात आलं आहे. सदर परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे.
हेही वाचा :