छत्रपती संभाजीनगर- बहुचर्चित 'छावा' चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. यामुळे अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाला, त्यानं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. याशिवाय त्यानं क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन देखील घेतलं. त्यानंतर नुपूर सिनेमागृह येथे नागरिक आणि पत्रकार यांच्याबरोबर त्यानं संवाद साधला. त्यावेळी त्यानं वादग्रस्त असलेल्या दृष्याबाबत खुलासा केला, महाराजांचे जीवन सर्वत्र जाणे महत्त्वाचे आहे, लेझीम ही आपली संस्कृती आहे. ते फक्त वीस सेकंदाचे दृश्य आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही, असं त्यानं स्पष्टीकरण दिलं. यावेळी व्हॅलेंटाईन डे नाही तर 'छावा' डे साजरा करा असं विकी कौशलनं आवाहन केलं.
प्रेरणा देणारे राजे : चित्रपट तयार करताना जवळपास सात महिने चित्रीकरण सुरू होते. त्यासाठी वजन वाढवले, महाराजांची माहिती जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या किल्ल्यांवर गेलो. महाराजांचा वेगळा प्रभाव आहे, तो तसाच असावा यासाठी आमच्या पूर्ण टीमनं मेहनत घेतली. ही भूमिका करण्याचे सौभाग्य कोणाला नाही, मला मिळाले, या आधीच्या केलेल्या भूमिका महान हस्तींच्या होत्या, मात्र महाराज दैवत आहेत. त्यांची भूमिका साकारणे अशा संधी क्वचितच मिळतात आणि मला मिळाली याचा आनंद आहे.
राजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे : आपला राजा कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे. शिवाजी सावंत यांची 'छावा' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी कपडे आणि दागिने खास तयार करून घेतले आहेत. आपल्या राजाचा चित्रपट आहे, त्यामुळे सर्वच सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मी माझं वजन वाढवलं, घोडेस्वारी शिकलो आणि बरंच काही केलं. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्या दिवसापासून सेटवर मला 'राजे' या नावानं हाक मारली. त्यामुळे विश्वास निर्माण झाला, तर त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येकानं मला राजे याच नावानं बोलल्यानं ऊर्जा निर्माण झाली. महाराजांबद्दल असलेल्या चुकीच्या गोष्टी पुसून टाकण्याचा प्रयत्न आम्ही केला, राजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केल्याचं विकी कौशलनं सांगितल.
व्हॅलेंटाईन डे नाही छावा डे साजरा करू : छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन राजांबद्दल बोलण्याची गरज वाटत नाही, पण आता देशात जाणार 'छावा' काय आहे. म्हणून त्यांच्या धर्तीवर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मराठा गर्जतो तर इतिहास होतो. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे नाही तर 'छावा' डे साजरा करूया असं आवाहन विकी कौशलनं केलंय. पहिल्यांदाच कुठल्यातरी ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतलंय, घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेताना समाधान वाटलं. एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली, सगळा ताणतणाव निघून गेला. क्रांतीचौक भागात छ. शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यावर तिथेच बसून महाराजांचे दर्शन घेत राहावं असं वाटत होतं.
आमचा उद्देश शुद्ध आहे : चित्रपट तयार करताना आमचा उद्देश स्वच्छ आणि चांगला आहे. जितके दिवस शूटिंग सुरू होते, तेव्हा रोज शिवगर्जना केल्याशिवाय काम सुरू केले जात नव्हते. जो वाद होत आहे, यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे. लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे, शंभू राजांच्या बद्दल जगासमोर आपली संस्कृती नेण्याचा आमचा विचार होता. त्याकाळी एकदा समारंभ, सण किंवा आनंदाचा दिवस असेल, त्यावेळी जर एखाद्यानं महाराजांना विनंती केली तर दोन मिनिट ते लेझीम खेळू शकतात, अशी आमची धारणा होती. मात्र शिवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेतला. 20 ते 30 सेकांदाचे दृष्य काढण्यात अडचण नव्हती. शेवटी महाराजांचे काम महत्त्वाचे ते दृष्य नाही. यामुळे काही फरक पडणार नाही, असं विकी कौशलनं म्हटलं आहे.
हेही वाचा :